‘सचिन वाझे मरत नसतात’

Analysis News

३५ वर्षापूर्वी  बोफोर्स  घोटाळ्याने सारा देश ढवळून निघाला  होता.  ह्या बोफोर्स तोफा सौद्याने राजीव गांधी  यांचे सरकार खाल्ले.  त्या घोटाळ्याचा आरोप होता फक्त ६५ कोटी रुपयांचा. पण बघता बघता  बोफोत्स हा भ्रष्टाचाराचा प्रतिशब्द बनला. पण म्हणून  घोटाळे, घोटाळ्यांचे आरोप थांबले नाहीत.  आपल्या देशात  भ्रष्टाचाराची प्रकरणे  घडतात, गाजतात आणि  काही दिवसांनी जणू काही घडलेच नाही अशा थाटात  लोक विसरून जातात.  नकलीमुद्रांक  छापून  सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा तेलगी आठवतो?  त्याच्याच कुंडलीचे  विजय मल्या,  हर्षद मेहता,   निरव मोदी आठवतात?  ही माणसे  आज सक्रीय नाहीत. पण  आपली किडलेली व्यवस्था अशा माणसांना  पुन्हा पुन्हा जन्म देत असते.  ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला  चाहिए.’

                 सचिन वाझे नावाचा अवतार सध्या गाजतो आहे. कोण आहे हा वाझे?  कोल्हापूरहून आलेला एक साधा  असिस्तांत पोलीस इन्स्पेक्टर.  ६२ गुन्हेगारांचा म्हणे त्याने एनकौंटर केला, निलंबित झाला. १६ वर्षाने परत आला आणि ‘तो लादेन नाही’ म्हणणाऱ्या  उद्धव  सरकारचाच आता एनकौंटर  व्हायची वेळ त्याने आणली आहे.  ५-५० हजार रुपये पगार असेल. पण आलिशान  कार उडवायचा, पंचतारांकित  हॉटेलात राहायचे,  नोटा मोजणारी मशीन  सोबत ठेवायचा.  साऱ्या महत्वाच्या केसेस त्याच्याकडे  असायच्या. हे उगाच मिळत नसते. अंबानीच्या घराजवळ  वाझे यानेच स्फोटकाने भरलेली कार  ठेवली असा त्याचेवर आरोप आहे.  सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने  सरकार हादरले आहे.  ‘गृहमंत्री अनिल देशमुखांनी ह्या वाझेला  महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते’ असे  परमबीर म्हणतात.  त्याच्यावरून एवढा भूकंप. तर उद्या  वाझेने  उद्धव ठाकरे यांचे नाव  घेतले तर काय होईल?  बाईट द्यायला संजय राऊत जागेवर नसतील. सरकारमध्ये एकूण ४० खाती आहेत आणि टी सारी  ‘टार्गेट’वर चालतात.  आरोप झाले म्हणून  सरकारे बुडवायची झाली तर  दर  दोन वर्षाने निवडणुका घ्याव्या लागतील.   टार्गेट दिल्यावरून भाजपने हल्लाबोल चालवला आहे. पण मला सांगा. कुठल्या सरकारमध्ये टार्गेट  नव्हते?  पक्ष चालवायचा तर  मंत्र्याला  आपल्या माणसांना टार्गेट द्यावेच लागते. कुठलीही पार्टी पोटावर चालते. पैसाच नसेल तर पुढारी  दुसर पार्टी शोधतात. हे उघड गुपित आहे. सत्ताधाऱ्यांना, पोलिसांना हप्ते द्यावेच लागतात.   उघड गुपित आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी आरडाओरडा चालवला आहे, तो ‘मी पुन्हा येणार’ हे म्हणणे खरे करून दाखवण्यासाठी. पण काहीही होणार नाही. चार दिवस टीव्हीवाले वाजवतील.  तोपर्यंत  नवे प्रकरण पुढे आलेले असेल.  मला सांगा. सुशांतसिंह, पूजा राठोड आज कोणाला आठवते?

0 Comments

No Comment.