शरद पवार प्रत्येक निवडणूक जिंकत आले. पराभव त्यांना माहित नाही. पण आज त्यांची फजिती झाली. आपले गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्याची धडपड त्यांच्या अंगाशी आली. ‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रानंतर महाआघाडी सरकार संकटात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांची खुर्ची धोक्यात आहे. सचिन वाझे देशमुखांना भेटला की नाही हा कळीचा मुद्दा बनला आहे. देशमुखांचा राजीनामा घ्यायचा की नाही त्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असे पवारांनी काल पत्रकारांना सांगितले होते. पण आज पवारांनी स्वतःहून पत्रकारांना बोलावून ‘आ बैल, मुझे मार’ करून घेतले.
फेब्रुवारीच्या अखेरीस अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची भेट झाली होती असे परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. पण या काळात देशमुख कोरोनाचा उपचार घेण्यासाठी नागपूरच्या रुग्णालयात होते. ५ ते १५ फेब्रुवारी या काळात देशमुख नागपूरच्या रुग्णालयात होते. पुढे १५ दिवस ते क्वारंटाईन होते. असे पवारांनी रुग्णालयाची कागदपत्रे दाखवत सांगितले. त्यामुळे आता चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही. अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवली हे मुळ प्रकरण आहे. ह्या मुख्य विषयापासून लक्ष उडवण्यासाठी भलतेच मुद्दे काढणे योग्य नाही असे पवारांनी सांगितले.
देशमुखांचा राजीनामा होणार नाही असेही त्यांनी सांगून टाकले. याच वेळी भाजपचे अमित मालवीय यांनी पाठवलेला एक रीट्वीट आला आणि पवार अस्वस्थ झाले. १५ फेब्रुवारीला देशमुखांनी पत्र परिषद घेतली होती. त्याची माहिती त्यांनी स्वतःहून ट्वीट केली होती. तो ट्वीट अंगावर आला. मग काय, पत्रकारांचा तोफखाना सुरु झाला. ‘देशमुख रुग्णालयात होते असे म्हणता तर मग ही पत्रपरिषद कशी?’ त्यावर पवार काय बोलणार? आतली माहिती अशी आहे की, पत्र परिषद करून देशमुख लगेच मुंबईला रवाना झाले होते. आता बोला. कुठे गेला करोना? क्वारंटाईन काळात बाहेर निघता येत नाही. मग देशमुख बाहेर कसे? सुधीर मुंगंटीवार लगेच कडाडले. म्हणाले, परमबीर यांच्या पत्राची कोर्टाकडून चौकशी झाली पाहिजे. त्यांचे आरोप खोटे आहेत की काय हे चौकशीतच कळेल. पवारांनी न्यायाधीश होऊ नये.
एकूणच काय तर देशमुखांचा राजीनामा लांबला. आता पवारांनीच गरज नाही म्हटल्यावर उद्धव ठाकरे दुसरे काय करू शकतात? पण सरकारवरचे संकट टळलेले नाही. भाजप आज अधिक आक्रमक झाला. परमबीर यांनी देशमुखांना लटकावले. आता देशमुख कोणाला लटकवतात ते पहायचे.