सोशल मिडीयावर आज एक विनोद खूप व्हायरल होतोय. ‘कोरोनापासून तुम्हाला स्वतःच स्वतःला वाचवायचे आहे. कारण सरकार सध्या स्वतःला वाचवण्यात व्यस्त आहे.’ विनोदाचा भाग सोडला तरी परिस्थिती तशीच आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने महाआघाडी सरकारमध्ये उडालेली खळबळ २४ तासानंतरही कायम आहे. ‘गृहमंत्री अनिल देशमुखांचा निकाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लावतील’ असे राष्ट्रवादीतले ‘काका’ शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे अनिलबाबुंचे टेन्शन कायम आहे. ‘काका, मला वाचवा’ म्हणायची वेळ देशमुखांवर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीतही असाच प्रसंग आला होता तेव्हा पवारांनी ‘आम्ही पक्षात निर्णय करू’ असे म्हटले होते. आता मात्र ते मुख्यमंत्र्याकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे पवारांच्या मनात आहे तरी काय?
‘अनिल देशमुखांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते’ असा गौप्यस्फोट परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. ह्या लेटरबॉम्बची माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्यामार्फत चौकशी करता येईल असे पवारांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हटले. याचा अर्थ काय? परमबीर यांच्या पत्राच्या टायमिंगवरून पवारांनी खूप शंका घेतल्या. पण मग त्यांनी चौकशीचा विषय का काढला? अनिलबाबूंना मंत्रीपदी कायम ठेवून चौकशी कशी होऊ शकते पवारांच्या मनात आहे तरी काय? मुंडे वाचले. पण देशमुखांचा बळी जाईल? नेमके ते उद्याच कळेल. तसे झाले तर उद्धव सरकारला तो मोठा धक्का असेल. पण त्याशिवाय सुटकेचा दुसरा मार्ग दिसत नाही. सरकारची आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा सुधारायची तर मोठे ऑपरेशन आवश्यक झाले आहे. देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप कमालीचा आक्रमक झाला आहे. पण अशा हवेत राजीनामा झाला तर भाजपपुढे झुकल्याचा संदेश जातो. कुठल्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांचा आवाज वाढता कामा नये असे आघाडीच्या आमदारांना वाटते. आज सहन केले तर उद्या मुख्यमंत्र्यांवर आरोप केला जाईल. कुणाकुणाचे राजीनामे घेणार? उद्धव ठाकरे दोन्ही बाजूने अडचणीत आहेत.