नागपूरकरांना ज्याची भीती वाटत होती तेच झाले. सात दिवसाचा लॉकडाउन लावूनही करोनाचे पेशंट कमी झाले नाहीत. उलट दररोज तीन हजार पेशंटची भर पडत आहे. लोक आता बेफिकीर झाले आहेत. सरकार सांगून सांगून ठाकले. पण रस्त्यावरची गर्दी कमी व्हायला तयार नाही. शुक्रवारी एकाच दिवशी करोनाने ३५ बळी घेतले. करोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत नागपुरात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.
सर्वपक्षीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज ही घोषणा केली. विशेष म्हणजे भाजपचे नेते या बैठकीला होते. पालकमंत्री म्हणाले, कडक निर्बंध असले तरी जनतेला त्रास होणार नाही, अर्थचक्र रोखले जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. धान्य, भाजीपाला दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत उघडी राहतील. ऑनलाईन रेस्टोरंट सायंकाळी सातपर्यंत उघडी राहतील. टेस्टिंग आणि ट्रेसिंग वाढवण्यात आले आहे. पण करोनाचे आकडे अचानक का वाढताहेत हे कोडे प्रशासनालाही उकलताना दिसत नाही. करोनाचा नवा अवतार आला आहे का? काही नमुने दिल्लीला तपासण्यासाठी मागे पाठवले होते. त्याचा अहवाल अजून आलेला नाही. लसीकरण सुरु असताना असे का व्हावे? लशीवरून शंका कायम असताना तिकडे पाकिस्तानवरून एक बातमी आली. पंतप्रधान इम्रान खान यांना करोना झाला. लस टोचून घेतल्यानंतर दोनच दिवसांनी ते पॉझिटीव्ह निघाले. आता बोला. वर्ष उलटूनही करोना कोणालाही पूर्णपणे समजलेला नाही असेच दिसते. त्यामुळे चिंता वाढत आहे. करोना नेहमीसाठी पाहुणा आला आहे का? हा करोनाही मोठा लहरी दिसतो. निवडणुका लागलेल्या पाच राज्यात लाखालाखाच्या सभा होत आहेत, लोक खेटून गर्दी करीत आहेत, जंगी पदयात्रा निघत आहेत. पण त्या राज्यात करोनाचा त्रास नाही. कदाचित निवडणुका संपल्यावर आपल्याकडचा करोना तिकडे जाईल. असे काही फिक्सिंग झाले आहे का? गमतीचा भाग सोडला तरी लोकांमध्ये अशी चर्चा आहे.
नागपुरातच करोना वाढत आहे अशातले चित्र नाही. मुंबई, पुण्यातही हेच चित्र आहे. मुंबईत तर ३०० इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्याच त्या बातम्या ऐकून लोक वैतागले आहेत. अनेकांना निराशेने गाठले आहे. काळजी घ्यावी लागेल. उठसुठ बाहेर निघू नका. खरेदीच्या मोहात तुम्ही करोना तर खरेदी करीत नाहीत ना याची काळजी घ्या. कारण चहूकडून वाईट बातम्याच येत आहेत. मात्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक चांगली बातमी दिली. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होतील असे त्यांनी जाहीर केले.