राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावेळी तरी नवा सरकार्यवाह देईल काय?

Editorial News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  सहसा बदलायला तयार नसतो.   हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र.. त्यांची विचारांची बैठक ठरली आहे.   गणवेश बदलायला  किती खळखळ केली? पण मोहन भागवतांनी  गणवेश बदलून घेतला.  तसाच पेच आता आहे.  संघाची दोन दिवसांची  अखिल भारतीय  प्रतिनिधी सभा   आजपासून कर्नाटकात  बेंगळूरू येथे सुरु झाली.    तिच्यात  संघाचा नवा  जनरल सेक्रेटरी म्हणजे सरकार्यवाह  निवडला जाणार आहे.  निवड म्हणजे निवडणूक वगैरे प्रकार संघात नसतो.    सर्वसाधारण कानोसा घेऊन थेट नावाची घोषणा केली जाते.   गेली १२ वर्षे  भय्याजी जोशी सरकार्यवाह म्हणून उत्तम प्रकारे काम पाहत आहेत. पण या वेळी    नव्या दमाचे दत्तात्रय होसबळे   यांची नियुक्ती केली जाईल  अशी माहिती आहे.

        २०२४ मध्ये  लोकसभा निवडणुका आहेत.  २०२५ मध्ये  संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.  या पार्श्वभूमीवर    सरकार्यवाहपदाची जबाबदारी कोणाकडे येते  याची परिवारात उत्सुकता आहे.  संघ  तरुणांच्या नावाने जप करतो. पण प्रत्यक्षात संघाची सूत्रे  ज्येष्ठांच्याच हातात आहेत.  ७० वर्षे वयाचे  मोहन भागवत ११ वर्षापासून   सत्तेत आहेत.     भय्याजी जोशी ७३ वर्षांचे आहेत. त्यांच्या जागी ज्यांना आणण्याचे सुरु आहे ते होसबळे ६३ वर्षांचे आहेत.  म्हणजे होसबळे हेही ज्येष्ठ आहेत.  त्यांना तरुण ज्येष्ठ म्हणता येईल.  सरकार्यवाहच पुढे सरसंघचालक  होतो, अशी प्रथा आहे. त्यामुळे  या जागी कोण येतो याची  जोरात चर्चा आहे.  विचारांचे  दोन गट  पडले आहेत.    भय्याजीना चालू ठेवा असे एक गटाला वाटते.   ‘छान सुरु आहे. बदलण्याची गरज काय?’  असे  जोशी समर्थकांना वाटते. पण  नवी टीम द्यायला  पाहिजे  असा आग्रह  असणारे यावेळी बहुमतात आहेत.  त्यामुळे खांदेपालट होईल.  होसबळे यांच्या रूपाने संघात   नवे चैतन्य  धावू लागेल    असे संकेत मिळत आहेत.

0 Comments

No Comment.