निवडणुका आल्या की राजकीय पक्षांना देवाधर्माची आठवण होते. तो पक्ष भाजप असेल तर मग विचारूच नका. सध्या बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने थेट रामाला खेचले आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ ह्या भयंकर लोकप्रिय टीव्ही मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा राम १९८८ मध्ये काँग्रेसी होता. राजीव गांधी त्यांना इंदूरमधून लोकसभा लढवू पाहत होते. पण योग आला नाही. रामनामाचा अनेकांना फायदा झाला. सीतेचे काम केलेली दीपिका चिखलीया, रावण बनलेले अरविंद त्रिवेदी ३० वर्षापूर्वी गुजरातमधून लोकसभा लढवून चक्क खासदार झाले. अरुण गोविल यांना तसा मोह झाला नाही. पण ते कॉन्ग्रेसच्या जवळ गेले होते. बाटलेला राम म्हणता येईल. पण राम तर आहेच. खास करून पश्चिम बंगालमध्ये भाजप त्यांना फिरवणार आहे. भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’चे नारे दिले , की ममता दीदी चिडायच्या. डुप्लीकेट का होईना, रामाला उभा करून त्या गोष्टीचा भाजप फायदा उठवू पाहत आहे.
राम, कृष्ण हे देशाचे दैवत. त्यांच्या नावाने आलेल्या टीव्ही मालिका जनतेने डोक्यावर घेतल्या होत्या. रामायण मालिका २५ जानेवारी १९८७ ला आली. दीड वर्षे चालली. लोक सकाळपासून टीव्हीवर बसत. मालिका सुरु होण्यापूर्वी टीव्हीची पूजा केली जाई. ते जिथे कुठे जात तिथे बायामाणसे त्यांच्या पाया पडत. अरुण गोविल यांच्यावर रामाचा शिक्का बसला. लोक त्यांना त्या नजरेने पाहू लागले. त्याचा त्यांच्या करिअरवर उलटा परिणाम झाला. सिनेमात मोठे काम मिळणे बंद झाले. आता तर ते कुठे दिसत नाहीत. वयही झाले आहे. गोविल सध्या ६३ वर्षे वयाचे आहेत. म्हणजे राम म्हातारा झाला. ‘जय श्रीराम’ चे नारे लावून भाजपने गेल्या वर्षी बंगालातील लोकसभेच्या ४२ जागांपैकी १८ जागा जिंकल्या होत्या. आता हा म्हातारा राम भाजपला विधानसभा जिंकून देतो काय? याकडे देशाचे लक्ष राहणार आहे.