सचिन वाझे ह्या सरकारला खाणार?

Editorial News

प्रसिध्द उद्योगपती   मुकेश  अंबानी  यांच्या घराजवळ गेल्या महिन्यात जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉरपियो  कार मिळाली.  नक्कीचे हे प्रकरण गंभीर होते. पण ते एवढे पेटेल असे वाटले नव्हते. पण पेटले.  ह्या प्रकरणाचा तपास करणारा  सचिन वाजे हा  पोलीस  सब इन्स्पेक्टर कोठडीत  आहे.  आगीच्या ज्वाळा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोचू पाहत आहेत.  भाजपने थेट मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु केली आहे. नारायण राणे यांचे पुत्र  आमदार नितेश राणे यांनी   तर मुख्यमंत्र्याच्या एक नातलगाचे नाव घेऊन  हल्ला चढवला.  महाआघाडीमध्ये प्रचंड टेन्शन आहे. सरकार बदनाम होतेय.

                  हे हल्ले कसे परतवायचे? राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी   सकाळी  मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.  सचिन वाझेवरच  चर्चा झाली असणार.  ह्या वाझेने   उद्धव सरकारचा पूर्ण बाजा वाजवला आहे.   मुख्यमंत्री  आतापर्यंत  वाझेला वाचवत होते.  आता  सरकारलाच  वाचवण्याची वेळ आली. क्रेडिबिलीटी पार संपली.  सुशांतसिंह, पूजा, मोहन डेलकर आणि आता मनसुख हिरेन यांच्या   संशयास्पद  मृत्यूची प्रकरणे  गृह खात्याने  नीट हाताळली नाहीत  म्हणून  आघाडीचे  मंत्री-आमदार नाराज आहेत. पण म्हणून अनिल देशमुख  यांच्याकडून  गृह खाते काढून घेतले  जाईल अशी शक्यता नाही.   तसे केले तर  ‘सरकार घाबरले’ असा संदेश जातो.  देवेंद्र फडणवीस यांच्या हल्ल्यापुढे   मंत्री टिकत नाहीत हे  अधिवेशनात  दिसले.   आता तर   भाजपच नव्हे तर एनआयए  ह्या  मोदी सरकारच्या  राष्ट्रीय तपास  एजन्सीशीही   दोन हात करावे लागणार आहेत.  तुम्ही पाहा. हे एनआयएवाले    सरकारला घाम फोडणार.  १८ वर्षापूर्वी   निलंबित वाझेला कामावर  कसे घेतले? इथपासून  कपडे फाडायला सुरुवात होणार आहे.  ‘सचिन वाझे ओसामा बिन लादेन नाही’ असे  उद्धव ठाकरे म्हणाले होते. लादेन नाही तर तो कोण? हे आता त्यांना सांगावे लागेल.

           कारमध्ये  स्फोटके ठेवण्याच्या कटात  वाझे सामील होता असे एनआयए म्हणते.    पण वाझे यांनी नेमके हे कशासाठी केले? अंबानी यांना भीती दाखवून खंडणी वसूल करण्याचा हा डाव होता का? कोणाच्या जीवावर वाजे  हे करीत होता?  मनसुखला संपवण्याची गरज नव्हती. का संपवले?  एकटा  अधिकारी   एवढी हिंमत करू  शकणार नाही. मग  आणखी काही पोलीस अधिकारी या कटात  सामील होते का?  वाझेवर  बड्या नेत्यांचा वरदहस्त  असला पाहिजे.  प्यादे म्हणून त्याचा वापर झाला असावा. नक्की कोणाचे  हात गुंतले आहेत? काहीतरी गडबड आहे. सध्या  अर्धेच बाहेर आले आहे.   १० दिवसाच्या कोठडीत वाजे  काय काय ओकतो  त्याकडे  देशाचे लक्ष  राहणार आहे.

0 Comments

No Comment.