करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागपुरात आजपासून सात दिवस कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक काम नसल्यास नागरिकांना घरातच थांबायला सांगण्यात आले आहे या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. मात्र विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची दिवसभरासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली जाणार आहे.
गर्दी टाळा असे आवाहन प्रशासनाने वारंवार करूनही लोक ऐकत नव्हते. गर्दी करीत होते. त्यामुळे वाढणारे रुग्ण काळजीचा विषय झाले होते. दोन दिवसापासून नागपुरात दोन हजारावर नव्या रुग्णांची भर पडत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजारावर गेली आहे.
करोनाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदीशिवाय प्रशासनाकडे दुसरा उपाय उरला नाही. पण अनेक व्यापाऱ्यांचा टाळेबंदीला विरोध आहे. लॉकडाउनचा निषेध करणारे फलक शहरात लागले आहेत. मात्र कुठल्याही परिस्थितीत टाळेबंदी यशस्वी करायचीच असा निर्धार प्रशासनाने केला आहे. घालून दिलेले नियम मोडले जाणार नाहीत हे पाहण्यासाठी अडीच हजार पोलीस रस्त्यावर उतरवण्यात आले आहेत.