गुरुवारी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहिला. रात्रभर झोप आली नाही. मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही. परीक्षाही घेऊ शकत नाही. विद्यार्थी सत्ता मागत नव्हते. कुठले बोर्ड किंवा कुठली आमदारकी मागत नव्हते. परीक्षा मागत होते. सरकारी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोग म्हणजे एमपीएससी परीक्षा घेते. लाखो विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षांना बसतात. नशीब आजमावतात. गेल्या तीन वर्षात ह्या आयोगाने एकही परीक्षा घेतली नाही. आता तर करोनाचे निमित्त मिळाले. चार वेळा परीक्षा पुढे ढकलली. आताही १४ तारखेला परीक्षा होती. तीन दिवस आधी आयोगाने फर्मान काढून राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली तेव्हा विद्यार्थ्यांच्या संतापाचा स्फोट झाला. पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर आले. पाहता पाहता हे लोण राज्यात पेटले. सरकार टेन्शनमध्ये आले. एमपीएससीवर खापर फोडले गेले. पण सरकार काय झोप काढत होते? सरकारच्याच आपत्ती निवारण विभागाने परीक्षा पुढे ढकलायला सांगितल्याचे उघड झाले. विजय वडेट्टीवार ह्या विभागाचे मंत्री. ते करोनाने आजारी आहेत. त्यांना न विचारताच सचिवाने निर्णय केला. मंत्री आजारी तर दुसऱ्या कुण्या ज्येष्ठ मंत्र्याला विचारता आले असते. लाखो विद्यार्थी स्वखर्चाने राज्यभरातून परीक्षा केंद्रावर येतात. वेळेवर गडबड नको म्हणून दोन दिवस आधी येतात. त्यांना वेळेवर परीक्षा पुढे ढकलली असे कसे सांगायचे? असा विचारही ह्या बिनडोक अधिकाऱ्यांच्या मनात आला नाही. सरकार कशा पद्धतीने काम करतेय याचा हा नमुना आहे. कुणाचाही पायपोस कुणात नाही. मंत्र्याला न विचारता अधिकारी परस्पर पत्र पाठवून मोकळे होतात. सत्ता सरकारची आहे की अधिकाऱ्यांची ? असा प्रश्न पडतो. ही एकच परीक्षा नव्हे, अनेक परीक्षा रखडल्या आहेत. अनेक जागांच्या परीक्षा झाल्या, निकाल नाही. निकाल झाला तर भरती नाही. ह्या गोंधळात मुलांचे नोकरीचे वय निघून जात आहे. मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा ह्यांना कुणी अधिकार दिला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता म्हणतात, की २१ तारखेला परीक्षा होईल. कशी होईल? आठ दिवसात तयारी होईल? आठ दिवसात करोना वाढला तर काय? मुळात परीक्षांचा करोनाशी संबंध जोडणेच चुकीचे आहे. करोनामध्ये अधिवेशन चालते, मोर्चे चालतात, परीक्षा का चालत नाही? करोनाचे नियम पाळून परीक्षा होऊ शकतात. पण त्यासाठी इच्छाशक्ती लागते. सरकारकडे ती नाही. मंत्रीसंत्री बदली, बढत्यामध्ये गुंग आहेत. बाबूलोक सरकार चालवत आहेत. पण लक्षात ठेवा. हे विद्यार्थी संतापले तर सरकार भस्म होईल. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात विद्यार्थ्यांनीच देशाचे सरकार उलटवले होते.