‘मराठी भाषेसाठी राज्याच्या या अर्थसंकल्पात काही तरतूद आहे काय? कोणाला कळले तर सांगा’ असा संदेश श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा संदेश वाचला आणि मलाच माझी लाज वाटली. खरेच आपण कुठल्या महाराष्ट्रात राहत आहोत? आपले राज्यकर्ते कुठल्या मानसिकतेचे आहेत? ‘ मंत्रालयाच्या दारात राजमुकुट घालून परंतु अंगावर लक्तरे लेवून मराठी उभी आहे’ अशी खंत कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ३० वर्षापूर्वी बोलून दाखवली होती. मराठीची आजही तीच अवस्था आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मराठीसाठी भोपळाही नसतो. कोणालाही याचे काही वाटत नाही. तुम्हाला कदाचित माहित नसेल. आपल्या राज्याला सांस्कृतिक धोरण आहे. १० वर्षापूर्वी ते मंजूर झाले. पण त्याची अंमलबजावणी करायलाच सरकार विसरले. दोन सरकारे येऊन गेली. महाआघाडीचे हे तिसरे सरकार आहे. मराठी अस्मितेच्या नावाने गप्पा मारणाऱ्या ह्या तिसर्या सरकारलाही काही करायचे नाही असे दिसते. कर्नाटकातही करोना आहे. पण त्या सरकारने भायेराप्पा यांच्या कादंबरीसाठी त्यांच्या अर्थ्संक्लापात एक कोटी रुपये ठेवले. आपल्याकडे सारा आनंदीआनंद आहे. भाषा, साहित्य, संस्कृती याविषयी चकार शब्द नाही. मराठी माध्यमाच्या चार हजार शाळा बंद पडल्या आहेत. इंग्रजीचे एजंट मंत्रालयात बसले असतील तर हेच होणार.
अशा हवेत इंग्रजीच्या वाढत्या आक्रमणापासून मराठीला कसे वाचवायचे हा खरा कळीचा प्रश्न आहे. मराठी भाषेची गरज वाटावी असे सरकारी पातळीवर काही घडत नाही. रोजगाराशी मराठीला जोडले जात नाही तोपर्यंत काही खरे नाही. माराहीच्या जोरावर आपण कमाई करू शकत नाही हे आजच्या तरुणांना माहित आहे. मग ते कशाला मराठी शिकतील? कशाला मराठी बोलतील? सरकारात बसलेल्यांना हे छान कळते. पण त्या दिशेने काही पावले टाकताना दिसत नाहीत. कमिशनर, कलेक्टर लेव्हलच्या अधिकाऱ्यांचे मराठी ऐकून डोके फोडून घ्यावेसे वाटते. मराठी आल्याशिवाय मुंबीत नोकरी किंवा धंदा करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. पण सरकारची तशी इच्छाशक्तीच नाही. कॉन्ग्रेस, भाजप…सारी सरकारे पहिले, सारे राजकारणी एका मालेचे मनी आहेत. कुणी मोठा चोर तर कुणी लहान चोर. कुणाला पकडायचे? मराठीचीच ही अवस्था आहे अशातला भाग नाही. जगभर भाषा मरत आहेत. मराठीही मरत आहे. गावखेडी, गरीब आहेत म्हणून आज काहीतरी मराठी दिसते आहे. भविष्यात जगात केवळ ३०० भाषाच तग धरतील असे अभ्यासक सांगतात. मराठीला वाचवणे महाराष्ट्राचे काम आहे. लक्षात ठेवा. भाषा मेली तर देशही मरतो.