महाराष्ट्रात करोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात तर दररोज हजाराच्या घरात करोनाबाधितांचा आकडा येत आहे. सरकारने निर्बंध वाढवले असतानाही लोक फारसे गंभीर दिसून येत नाहीत. शनिवार-रविवारी बाजारपेठ आणि दुकाने बंद असतानाही रस्त्यांवर लोकांची गर्दी दिसली. काही जणांनी तर मास्क देखील लावले नव्हते. कुठलेही महत्वाचे काम नसताना लोक बाहेर पडत असल्यामुळे करोना नियमांचा फज्जा उडतो आहे. प्रशासन मात्र हतबल आहे. एकादोघांना पकडून दंड वसूल करता येतो. पण इथे गर्दीचा मामला आहे. कुणा कुणावर कारवाई करणार? इतर मोठ्या शहरांमध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही. करोनाचा स्कोअर त्यामुळेच वाढत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर असताना हे चित्र चिंता वाढवणारे आहे. प्रशासनालाही गोंधळाचा संसर्ग झालेला दिसतो. नागपुरात रोज हजारावर नवे रुग्ण सापडत असताना त्या तुलनेने लसीकरण कमी आहे. मास्क, सुरक्षित अंतर, हात धुणे ह्या उपायांची नवलाई थोडीफार कायम आहे. मात्र लसीकरणाविषयी फारशी जनजागृती होताना दिसत नाही. उलट गोंधळाची स्थिती आहे. केंद्रांवर ज्येष्ठांच्या रांगा पाहायला मिळतात. लोकांना ताटकळत ठेवले जाते. करोनाला पूर्णपणे हरवायचे असेल तर लस घेणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले तर ‘हर्ड इम्युनिटी’ विकसित होईल, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. रोज १० ते १५ हजार लोकांचे लसीकरण व्हावे असे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. मात्र त्याच्या निम्मे तर कधी त्यापेक्षा थोडे जास्त लसीकरण होते अशी आजची स्थिती आहे. लसीकरणाचा हा वेग राहिला तर शेवटच्या माणसाला लस टोचायला २०२४ साल उजाडेल. तो पर्यंत करोना किती लोकसंख्या शिल्लक ठेवील हाही प्रश्नच आहे.