जहाज बुडायला आले ते उंदरांना आधी कळते असे म्हणतात. ते बाहेर उड्या मारतात. तसे कॉन्ग्रेसचे झाले आहे. कालपर्यंत कॉन्ग्रेसने पोसलेले ज्येष्ठ नेते डोळे वटारत आहेत. गुलाम नबी ७१ वर्षांचे आहेत, आनंद शर्मा ६८ वर्षांचे आहेत. घाटावर जायच्या वयात ह्या नेत्यांना कॉन्ग्रेसचे कसे होणार? याची चिंता पडली आहे. दोन वर्षे होत आहेत. कॉन्ग्रेसला फुल टाइम अध्यक्ष नाही. गुलाम नबी या वयात बंड करू शकतात यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. ते बाहेर गेले नाहीत तर सोनिया-राहुलनिष्ठावंत त्यांना काढून टाकतील. राजकारणात काहीही होऊ शकते. इंदिरा गांधी यांच्या काळातही कॉन्ग्रेस फुटली आहे. या वेळचे फुटणे थोडे वेगळे आहे. कारण सोनिया गांधी यांची तब्येत ठीक नाही आणि राहुल गांधी सिरिअस नाही. कुणी गांधी मैदानात नसेल तर कॉन्ग्रेसला कुत्रा विचारणार नाही. कुणी गांधी चवीला पाहिजे. मग तो पप्पू असला तरी चालेल.
गेल्या वर्षी बिहार निवडणुकीच्या आधी २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली होती. सोनिया गांधींनी त्यांना कसबसे समजावले. पण यातले काही नेते आता पुन्हा डरकाळ्या फोडू लागले आहेत. आठ नेत्यांनी जम्मूमध्ये नुकतीच बैठक करून जुनाच विषय ऐरणीवर आणला आहे. कॉन्ग्रेस कमकुवत होत असल्यामुळे आम्ही एकत्र येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बंडखोरांच्या ह्या टीममध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल यासारखे तगडे नेते आहेत. आम्ही सोनिया गांधी यांच्या विरोधात नसल्याचेही हे नेते सांगत आहेत. पण जम्मूमधील कॉन्ग्रेसचे कार्यकर्ते हे मानायला तयार नाहीत. कार्यकर्त्यांनी गुलाम नबी यांचा पुतळा त्यांच्या घरासमोर जाळला. काश्मीरच्या इतिहासात प्रथमच हे घडले. गुलाम नबी राज्यसभेतून नुकतेच रिटायर झाले. त्यावेळी नरेंद्र मोदींनी तारीफ काय केली. गुलाम नबी बदलले. मोदींसारखे नेते आवडतात असे त्यांनी जाहीरपणे सांगून टाकले. गांधीभक्तांना त्यामुळेच मिरच्या झोंबल्या आहेत. दुसरी मोठे कारण एक घडले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अब्बास सिद्दिकी यांच्या इंडियन सेक्युलर फ्रंटसोबत आघाडी करायचा निर्णय कॉन्ग्रेसने परस्पर केला. आनंद शर्मा याला कडाडून विरोध करीत आहेत. कट्टरवादी पक्षासोबत कॉन्ग्रेस कसा बसू शकतो? असे त्यांचे म्हणणे आहे. हा प्रश्न करताना कॉन्ग्रेस केरळमध्ये इंडियन युनियन मुस्लीम लीगसोबत बसला आहे हे ते विसरतात. कालपर्यंत कॉन्ग्रेस घराण्याला आव्हान देण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. आता ते सुरु झाले आहे. पाच राज्यात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. प्रचार प्रमुखांची यादी कशी जाहीर होते त्याची सारे वाट पाहत आहेत. येणाऱ्या दिवसात असंतुष्ट नेते आणि गांधी कुटुंब यांच्यातले शीतयुद्ध आणखी चिघळणार आहे. गुलाम नबी भाजपमध्ये गेले तर ती आत्महत्या ठरेल. पण त्याशिवाय गुलाम नबी करू काय शकतात? सारे दोर कापले आहेत. मोदींचा दरवाजा तेवढा उघडा आहे.