सुपरस्टार ७८ वर्षे वयाचे अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्यावर लवकरच एक मोठे ऑपरेशन करावे लागणार आहे. खुद्द अमिताभ यांनीच आपल्या ब्लॉगमध्ये शनिवारी रात्री ही माहिती दिली. यापेक्षा जास्त आपण लिहू शकत नाही असेही ते म्हणाले आहेत. अमिताभ यांनी एकच ओळ लिहिली आहे. पण ह्या ओळीने साऱ्यांना हादरवून टाकले. अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. घरचाच माणूस आजारी पडला अशी भावना आहे. फार कमी अभिनेत्यांच्या वाट्याला हे भाग्य येते.
त्याला काय झाले? कसली सर्जरी आहे? अशी विचारणा त्याचे चाहते करीत आहेत. सोशल मिडीयावर सक्रीय असलेल्या अमिताभ यांनी दोन दिवसापूर्वी काहीसे गूढ वाटणारे ट्वीट केले होते. त्यात तो म्हणाला होता, ‘कुछ जरुरत से जादा बढ गया है. कुछ काटने पर सुधारनेवाला है. जीवन काल का कल है ये, कल ही पता चलेगा कैसे रहे वे.’
अमिताभ पडद्यावर फिट दिसतो. पण तसा तो नाही. त्यांना अनेक रोग आहेत. ४० वर्षांपूर्वी ‘कुली’ सिनेमाच्या शुतींच्या वेळी अमिताभ गंभीर जखमी झाले होते. मारामारीच्या दृश्यात खलनायकाने पोटात जरा जोरातच ठोस मारला होता. कधी कधी तर ते आपल्या दोस्तांना म्हणतात, ‘मी जिवंत आहे, चालता फिरता आहे हे आश्चर्यच आहे.’ मध्यंतरी त्यांना करोना झाला होता. तब्बल २२ दिवस रुग्णालयात राहावे लागले होते. त्यातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा कामाला भिडले होते. या वयात माणूस सारे संपले असे मानून घरबसल्या दिवस मोजतो. पण जसजसे वय वाढत आहे तसतसा अमिताभ यांचा उत्साह वाढताना दिसतो. अमिताभ म्हणजे पॉवर स्टेशन आहे. ‘चेहरे’ आणि झुंड’ हे त्यांचे दोन सिनेमे लवकरच झळकणार आहेत. ‘ब्रम्हास्त्र’चे शुटींग चालू असताना तब्येतीने धोका दिला. पण थांबतील तर ते अमिताभ कसले? त्यांचे चाहते अमिताभ बरे होण्यासाठी प्राथना करीत आहेत. आपणही देवाला त्यांच्या आयुष्यासाठी भिक मागू या.