आपला वनमंत्री संजय राठोड याचे काय करायचे? राजीनामा घ्यायचा की चालू द्यायचे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड टेन्शनमध्ये आहेत. एवढा ताणतणाव तर त्यांना भाजपला सोडचिठ्ठी देतानाही आला नव्हता. पूजा राठोड तर जीवानिशी गेली आणि आता महाआघाडी सरकारचा श्वास कोंडतो आहे. आता हे प्रकरण पुजापुरते किंवा संजय राठोडपुरते मर्यादित राहिलेले नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उभा झाला आहे. राजकीय लढाई पेटली आहे. एकाहून एक गंभीर आरोप सुरु असताना मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यांना सरकार टिकवायचे आहे. सरकारने पोलीस तपासाला ढाल बनवली आहे. तपास चालू असताना प्रश्नांची उत्तरे द्यायची नसतात अशी सरकारची भूमिका आहे.
येत्या सोमवारपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अवघे दोन दिवस उरले आहेत. अधिवेशनाच्या इतक्या तोंडावर राजीनामे करायचे नसतात. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. तिकडे चित्रा वाघ यांनी हल्ले तेज केले आहेत. बेहिशोबी मालमत्तेचे जुने प्रकरण काढून सरकारने त्यांच्या नवऱ्याच्या मागे एसीबी लावून दिली खरी. पण चित्रा दबल्या नाहीत. त्यांचे फायरिंग सुरूच आहे. निर्णय ठाकरे यांना घ्यायचा आहे. ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी ठाकरे यांची परिस्थिती आहे. राजीनामा घेतला तर भाजपला घाबरले असा संदेश जातो. उद्धव स्वतःच्या कडक इमेजला खूप जपतात. त्यामुळे भाजपपुढे ते झुकणार नाहीत. आधीच विदर्भात शिवसेना औषधापुरती आहे. राजीनामा घेतला तर विधानसभेची दिग्रसची जागा हातून जाते. वाशिमची लोकसभेची भावना गवळी यांची जागा धोक्यात येते. राठोड घरी गेले तर शिवसेनेचे मोठे राजकीय नुकसान आहे. म्हणून उद्धव थांबले आहेत. अन्यथा पोलीस तपासाची वाट पहावी असा हा मामला नाही. राजीनामा घ्यायचाच असता तर राठोड पोहरादेवी गडावर गेले त्याच दिवशी घेतला असता. कोरोनाचे नियम मोडल्याचा बहाणा होता. ‘मुख्यमंत्र्यांनी डोळे मिटलेले नाहीत’ असे संजय राऊत म्हणाले. तर मग मुख्यमंत्री तिसरा डोळा उघडतील काय?
मला एक सांगा. राजकारणात कोणावर आरोप झाले नाहीत? देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्र्यांवरही चिक्की घोटाळयापासून तो बरेच काही आरोप झाले होते. पण ते सारे मंत्री वाचले. आता ह्या सरकारात राष्ट्रवादीने त्यांचा मंत्री धनंजय मुंडे यांना वाचवले. मग आपण आपल्या राठोड यांना बकरा कशाला बनवायचे? हा विचार शिवसेनेत जोर मारतो आहे. पूजाला न्याय मिळाला नाही म्हणून महिला मतदार डिस्टर्ब होऊ शकतात. पण त्यांना सांभाळता येईल. निवडणुकीला अजून साडे तीन वर्षे आहेत. तुम्ही लिहून ठेवा. काहीही होणार नाही. भाजपवाले गोंधळ घालून घालून किती घालतील? तसेही कोणाला काम करायचे आहे? राजकारणात कालचा दिवस लक्षात ठेवायचा नसतो. इथे साधुसंत थोडेच आले आहेत. लफडी होणारच. पण म्हणून राजीनामा घ्यायचे ठरवले तर सरकारच रिकामे करावे लागेल.