प्रसिध्द उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे सुप्रीमो ६३ वर्षे वयाचे मुकेश अंबानी यांच्या जीवावर कोण उठलं असावं? काल रात्री मुंबईतील त्यांच्या बहुमजली घराजवळ रस्त्यालगत स्फोटकांनी भरलेली स्कोर्पियो कार सापडल्याने खळबळ आहे. कारमध्ये एक पिशवी सापडली. तिच्यातल्या पत्रात ‘ये तो ट्रेलर है’ अशा शब्दात अंबानी यांना धमकी आहे. कारमध्ये जिलेटीनच्या २१ कांड्या सापडल्या. खाणकामासाठी स्फोट घडवण्याकरिता असल्या कांड्या वापरल्या जातात. भूसुरुंग घडवण्यासाठी नक्षलवादी अशा कांड्या वापरतात अशी माहिती आहे. ह्या कांड्या नागपूरच्या सोलर उद्योगात तयार झाल्या आहेत. त्यामुळे हे नागपूर कनेक्शन तपासण्याच्या कामाला पोलीस भिडले आहेत.
ही कार चोरीची होती असे तपासात लक्षात आले आहे. कारचा मालकही पोलिसांनी शोधला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी गाडी चोरीला गेल्याचे म्हटले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती गाडी आलेली दिसते. पण तिच्या चालकाने चेहरा झाकलेला आहे. ती कार बराच वेळ उभी होती. अंबानी यांच्या घराभोवती पहारा देणाऱ्या लोकांना संशय आला आणि धावपळ झाली. मात्र ती स्फोटके कुणी ठेवली? हे गूढ कायम आहे. मुंबईत ती आणली जाताना गुप्तचर यंत्रणा कुठे होत्या? हाही प्रश्न आहेच.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष अंबानी आणि अदानी ह्या दोन उद्योगपतींना टार्गेट करीत आहेत. गेली तीन महिने दिल्लीच्या सीमांवर चालू शेतकरी आंदोलनात अंबानी यांच्यावर टीकेचे सत्र सुरु आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांना मात्र हे प्रकरण घडवून आणलेले वाटते. काहीही असो. एका मोठ्या उद्योगपतीला टार्गेट केले जात असेल तर देशासाठी तो चिंतेचा विषय आहे. मुंबई पोलीस हे आव्हान कसे पेलतात ते पहायचे.