मुख्यमंत्र्यांवर भारी पडताहेत संजय राठोड?

Editorial News

पूजा चव्हाण ह्या मराठवाड्यातील परळीच्या अवघ्या २२ वर्षे वयाच्या तरुणीच्या आत्महत्येमुळे वादात अडकलेले   राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड  तब्बल १५ दिवसानंतर  बंजारा समाजाची काशी  पोहरादेवी मंदिरात  प्रगटले. पूजाच्या आत्महत्येत भाजपने  राठोड यांचे नाव घेतल्याने ते काय बोलतात याकडे  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. राठोड यांनी मी त्यातला नव्हे असे सांगून सारे आरोप झटकून टाकले. ‘माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत. मला उध्वस्त करण्याचा प्रयत्न होतोय. घाणेरडे राजकारण होत आहे. माझी आणि समाजाची बदनामी करू  नका’ असे ते पत्रकारांशी बोलले. आपण नॉट रिचेबल नव्हतो तर मुंबईत घरी बसून शासकीय काम करीत होतो  असेही ते म्हणले.  पोलीस चौकशीत सत्य बाहेर येईल असे राठोड म्हणतात.  तेच सत्य समजून घेण्याची महाराष्ट्राची धडपड आहे.  पूजाने  आत्महत्या का केली?  सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या त्या १२ क्लिप्समधला  एक आवाज संजय राठोड यांचा आहे का?    या प्रकरणात ज्या गोष्टी समोर आल्या  त्याचे उत्तर मिळाले नसल्याने प्रश्न कायम आहे… पूजा चव्हाणचं काय झालं?

               पुजाला क्षणभर बाजूला ठेवा. गर्दीचे काय? विदर्भात करोना वाढला आहे. गर्दी करू नका असे आवाहन मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी  कालच   जाहीरपणे केले होते.  तरीही राठोड यांच्या स्वागताला हजारो लोक कसे जमले?  समाजाचा एवढा मोठा फौजफाटा पोहरादेवीला कुणी आणला? खुद्द राठोड यांनी का येऊ दिला? साहेबाची भीती नाही वाटली?  जमावबंदी असताना  आणि पोहरादेवीला हजारो  लोक  जमणार याचा अंदाज असताना पोलिसांनी ही गर्दी वेळीच का रोखली नाही?  समाजाला, समर्थकांना वेठीला धरून दबाव  आणण्याचा नवा पायंडा पडतो आहे का?  राठोड हे  उद्धव ठाकरे यांच्यावर भारी पडत आहेत का? अलीकडे त्यांच्या मंत्र्यांनी  ‘वर्क फ्राम होम’ सुरु केले आहे का?  मुख्यमंत्र्यांनी त्यांना अभय दिले आहे का?  तसे लोक बोलत आहेत. तसे नसते तर राठोड आधी ‘मातोश्री’वर गेले असते, पोलिसांकडे गेले असते.  आपल्या आवाजाचा नमुना पोलिसांना दिला असता. मामलाच संपला असता. आपल्या हायटेक पोलिसांचेही  कठीण आहे.  तपासाला किती वेळ घेणार? साध्या क्लिप्स तपासायला एवढा वेळ लागतो का? वेळ लागतोय म्हणून तर भाजपच्या हाती आयते कोलीत लागले आहे.  भाजप नेत्या चित्रा  वाघ आज पुन्हा कडाडल्या.  आठ दिवसांनी बजेट अधिवेशन सुरु होत आहे. भाजप ते पेटवणार.  त्या आधी  निकाल  लावून मुख्यमंत्री पूजाला  न्याय देतील अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे? कारण बाहेर चर्चा आहे.  ‘राठोड यांचा  मुंडे होतोय.’  

0 Comments

No Comment.