‘अमिताभ बच्चनचे चित्रपट बंद पाडू’ अशी आक्रमक घोषणा करणारे प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना हायकमांडने चांगलाच ब्रेक मारला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत कॉन्ग्रेस हस्तक्षेप करणार नाही असे कॉन्ग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख रणदीपसिंह सुरजेवाला यांनी दिल्लीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे नानाभाऊंना एक पाऊल मागे हटावे लागले. अमिताभचा बहुप्रतीक्षित ‘झुंड’ चित्रपट येत्या १८ जून रोजी थिएटरमध्ये लागत आहे. पण आम्ही त्यावेळी फक्त काळे झेंडे फडकावणार असे नानांनी म्हटले आहे. सदा प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा पटोले यांचा स्वभाव आहे. प्रदेशाध्यक्षपदी आल्यानंतर तर त्यासाठी आक्रमक वक्तव्ये करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. सुरुवातील त्यांनी कॉन्ग्रेसला नंबर एकच पक्ष करू असे ते म्हणाले. ‘पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून कॉन्ग्रेसच्या राज्यात आवाज उठवत होता. मग आता गप्प का?’ म्हणत त्यांनी अमिताभ बच्चन , अक्षय कुमार यांना फटकारले. इथेच ते थांबले नाही तर अमिताभचे चित्रपट बंद पडू असेही सांगून टाकले. त्यांच्या ह्या वक्तव्याने कॉन्ग्रेसमध्येच खळबळ माजली. सिनेमा बंद पडण्याची भाषा कॉन्ग्रेसची असू शकत नाही अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये उमटली. ‘झुंड’ सिनेमाचा बहुतेक शुटींग नागपुरातच झाले आहे. ‘स्लम सॉकर’चे प्रणेते विजय बरसे यांच्या जीवनावरील ह्या सिनेमात अमिताभचा मोठा रोल आहे. बारसे हे नागपूरचे आहेत. आपल्याच माणसाच्या सिनेमाला काळे झेंडे कसे दाखवायचे अशा पेचात नागपूरचे कॉन्ग्रेसवाले आहेत. त्यामुळे नागपुरात काऊ होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे.