मंत्री राठोड यांचा ‘मुंडे होणार’ की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामशास्त्री होणार?

Editorial Politics

‘सामना’ सिनेमात निळू फुले यांच्या तोंडी एक  यादगार डायलॉग आहे…मारोती कांबळेचं काय झालं? हा मारोती तर केव्हाच गेला.  निळूभाऊही आपल्यात नाहीत.  पण तोच प्रश्न पात्र बदलून विचारण्याची पाळी  जनतेवर आली आहे… ‘पूजा चव्हाणचं काय झालं?’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सखोल चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते  बाहेर येईल.’  भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘सत्य बाहेर आले पाहिजे.’  बाहेर आले पाहिजे  म्हणणे सोपे आहे. पण सत्य बाहेर येणार ते कसे? पूजा चव्हाण ह्या बीड जिल्ह्यातील परळी गावच्या  बंजारा तरुणीने  सात फेब्रुवारी रोजी पुण्यात  तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली त्या गोष्टीला आठवडा उलटला. केवळ सत्याची भाषा सुरु आहे.   पूजाने कुठलीही चिठ्ठी मागे सोडलेली नाही. तिच्या घरचेही काही बोलत नाहीत. त्या रात्री  तिच्यासोबत असलेल्या दोघांनी पूजा चक्कर येऊन पडली  असा जबाब पोलिसांना दिला आहे.  ह्या दोघांना  शेजाऱ्यांनी  पकडून ठेवले म्हणून  त्या क्लिप्स तरी मिळाल्या. त्या व्हायरल झाल्या तेव्हा मोठा राजकीय भूकंप झाला. त्या क्लिप्समधील  संभाषणातला  आवाज   महाआघाडीतले  वनमंत्री विदर्भातले  संजय राठोड यांचा आहे  असा थेट आरोप भाजप नेत्या चित्रा राठोड यांनी नाव घेऊन केल्याने  राज्यात खळबळ आहे.  थोडीफार अशीच  बाईची  भानगड  झाली तेव्हा   सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  धडाधडा  काय ते सांगून मोकळे झाले. पण इथे  संजय राठोड ‘नॉट रिचेबल’ आहेत.  त्यामुळेच सारा संशयकल्लोळ माजला आहे.

                      हल्ली तरुणींच्या आत्महत्या हा बातम्यांचा विषय राहिलेला नाही. अतिमहत्वाकांक्षा आणि त्यातून आलेल्या  वैफल्यातून मुली आयुष्य संपवतात. ह्या भानगडीत कुणी मोठा व्हिव्हीआयपी  अडकतो तेव्हा  त्याची बातमी होते. चार दिवस लोक हळहळ व्यक्त करतात आणि संसाराला लागतात. तरीही पूजाचे ह्या निष्ठुर जगातून  जाणे  मन सुन्न करणारे आहे. पूजा ही साधी तरुणी नव्हती.  सोशल मिडियावर स्टार होती. धडपडी, डेअरिंगबाज   होती.  समाजाच्या  मागण्या  मंत्र्यांकडे  घेऊन जायची.   संजय राठोड यांच्या कार्यालयासमोर  अनेकदा लोकांनी तिला पाहिले आहे. तिचीही  काही  स्वप्नं असतील.  पण उमलण्याआधीच ही कळी कोमेजली.   अशा अनेक ‘कळ्या’ राजकारणात घुटमळताना आपण पाहतो.  आता त्या सर्वांची काळजी करावी  अशी परिस्थिती आली आहे.                  पूजा ही  बंजारा म्हणजे  मंत्री राठोड  यांच्याच समाजाची  होती.  त्यांच्या परिचयातील होती.  तरीही  काही घडलेच नाही अशा थाटात ते कामाला लागले होते.   मिडीयावर क्लिप्स वाजू लागल्या तेव्हा  ते गायब झाले.   घटनेनंतर तीन दिवसांनी भाजपवाल्यांनी  उडी घेतली तेव्हा राजकीय रंग आला. चौकशीअंती कारवाई करू असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. आत्महत्येच्या  इतर प्रकरणांमध्येही पोलीस  असेच वागतात का?  चौकशी होत नाही तो पर्यंत  संशयिताला ताब्यात घेत नाहीत?  उद्धव ठाकरेंना रामशास्त्री व्हावे लागेल.   इथे  राजकीय अडचण अशी, की  संजय राठोड यांना  बाजूला केले तर  शिवसेना अडचणीत येते.  यवतमाळ जिल्ह्यातला  सेनेचा हा एकमेव आमदार आहे.   सलग २० वर्षापासून निवडून येतो आहे.   विदर्भातल्या शिवसेनेचा तो चेहरा आहे. गडबड दिसली तर उद्धव आपल्याच पक्षाचा चेहरा खराब करतील? पूजाला  मेल्यावर तरी न्याय मिळेल?  की ‘आयुष्यातून उठवण्याचा आणखी एक प्रयत्न’ म्हणून  आणखी एका  मंत्र्याला क्लीन चीट दिली जाईल?  पोलीस दबावात  आहेत अशी ओरड विरोधकांनी केव्हाच सुरु केली आहे. ‘राठोड यांचा मुंडे होणार’  अशी जोरात कुजबुज आहे. काय गंमत आहे  पहा. न्याय-अन्याय हे विषयही राजकीय पक्षांनी वाटून घेतले आहेत.  धनंजय मुंडे यांच्या भानगडीत  शिवसेना किंवा कॉन्ग्रेसने डोके खुपसले नाही.  आता  एका तरुणीच्या    संशयास्पद मृत्युत  दोन्ही कॉन्ग्रेस स्थितप्रज्ञ आहेत. ‘न्यायदान’ हे असे वाटून घेता येते का? मुंडेंचा काय न्याय झाला हे अखेरपर्यंत कळले नाही.   एक बायको असताना दुसरीला ठेवले. तसे कबूल  केले. तिसरीची मेहरबानी. तिने तक्रार करून नन्तर मागे घेतली. आपल्याकडे  कायद्याने हे सर्व  करता येते?   तरीही मुंडे सुटले.  शरद पवार है तो मुमकिन है, असे काही आहे का?

0 Comments

No Comment.