कोण आहेत हे राकेश टिकैत?

Editorial

दिल्लीच्या सीमांवर गेली ७० दिवस घोंघावणारे  शेतकरी आंदोलनाचे वादळ  शमायला तयार  नाही.  नरेंद्र मोदी यांच्यासारखा  कणखर पंतप्रधान आणि त्यांचे सरकार  ह्या आंदोलनापुढे हतबल आहे. राज्यसभेतल्या भाषणातून मोदी काही तोडगा देतील असे वाटले होते. पण मोदी झुकायला तयार नाहीत आणि तिकडे शेतकऱ्यांनीही येत्या  गांधी जयंतीपर्यंत म्हणजे आणखी आठ महिने   ठाण मांडून बसण्याचा निर्धार केला आहे. कुठून एवढी ऊर्जा मिळत असेल  ह्या आंदोलकांना? कोण आहे यांचे पॉवर स्टेशन?  प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर  आंदोलन फसले असेच सारे मानत होते.  गाझीपुर सीमेवर ह्या आंदोलनाचे एक नेते राकेश टिकैत   यांनाही वैफल्य येऊ लागले होते. पोलीस बळाचा वापर करून आंदोलन उधळणार  असा रंग स्पष्ट दिसत होता. टिकैत यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.    वृत्तवाहिन्यांवर  देशाने  हे चित्र  पाहिले आणि    आंदोलनाला विलक्षण कलाटणी मिळाली. आपल्या नेत्याला रडताना पाहून  खवळलेले पश्चिम उत्तर प्रदेशातले  हजारो शेतकरी    त्याच   मध्यरात्री  गाझीपुरच्या  सीमेवर पोचले. आंदोलनाला जीवदान  मिळताना  एका निर्विवाद राष्ट्रीय  शेतकरी नेत्याचा उदय झाला होता. 

        कोण आहेत हे राकेश टिकैत?   हे घराणे मुळचे मुझफ्फरनगरचे.   १९८८ मध्ये  पाच लाख शेतकऱ्यांनी दिल्लीत शक्तीप्रदर्शन केले होते. त्या आंदोलनाचे नेते होते महेंद्रसिंह टिकैत.   ह्या महेंद्रसिंह  यांचे राकेश टिकैत हे पुत्र आहेत. पित्याने शेतकऱ्यांचे  मोठे लढे लढले. पण त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या  एवढ्या ऐरणीवर आणता  आल्या नव्हत्या. नऊ वर्षापूर्वी महेंद्रसिंह गेले. त्यानंतर  राकेश यांनी  पित्याची लढाई पुढे चालवली.    भारतीय किसान युनियनचे ते   सर्वेसर्वा आहेत. ५१ वर्षे वयाचे  राकेश   यांनी वेगवेगळ्या शेतकरी आंदोलनात आतापर्यंत ४४ वेळा तुरुंगवास भोगला आहे. त्यावरून त्यांच्या  लढाऊ व्यक्तिमत्वाची  ओळख होते.  शेतकरी असले तरी पैसेवाले आहेत.   १९८५ मध्ये राकेश दिल्ली पोलीस खात्यात  भरती झाले होते. पण वडील आंदोलनात असल्यामुळे   त्यांच्यावर सारखा दबाव येई.  शेवटी १९९३ मध्ये त्यांनी  पोलिसाची नोकरी सोडली आणि  शेतकरी आंदोलनात वडिलांना सोबत करू लागले.  तुरुंगाच्या वाऱ्या करणारे राकेश हे चक्क विवाहित आहेत.   त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत.     त्यांनी विधानसभा आणि लोकसभेचीही निवडणूक लढवली.  हरले. पण म्हणून घरी बसतील तो त्यांचा पिंड नाही.  त्यामुळेच  शेतीचे तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी त्यांनी चालवलेल्या लढ्याकडे  आज देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष आहे.  कोण जिंकणार? मोदी सरकार की टिकैत?  ह्या निकालात  २०२४च्या  निवडणुकीचा निकाल दडला आहे.

0 Comments

No Comment.