माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने खूप गोलंदाजांचे चेंडू फोडून काढले असतील. पण आता लोक त्याला फोडत आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून अमेरिकी पॉपस्टार रिहाना हिने चिंता व्यक्त केली म्हणून सचिन तेंडुलकर याने तिला चांगलेच सुनावले होते. ‘आमच्या देशाच्या प्रश्नांमध्ये कशाला डोके खुपसतेस?’ एवढेच सचिन म्हणाला होता. पण त्यामुळे सचिन आता आंदोलन समर्थकांच्या रडारवर आला आहे. त्याचे एकेकाळचे प्रशंसकही त्याला चांगलाच ‘ट्रोल’ करीत आहेत. आपले शरद पवारही त्याच्यावर उखडले. मात्र केरळमध्ये लोकांनी सचिनच्या पोस्टरवर तेल ओतले म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप संतापले.
शेतकरी आंदोलनावर विदेशातील सेलिब्रिटींनी टीका केल्याने वातावरण तापले आहे. भारताच्या बदनामीचे हे षड्यंत्र आहे असे काहींना वाटते तर काहींना यात काही गैर वाटत नाही. ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयावर बोलताना सचिनने काळजी घेतली पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी त्याला फटकारले आहे. कॉन्ग्रेसचे खासदार जसबीर गिल यांनी तर तेंडुलकर हा भारतरत्न किताबाला पात्र नाही अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची प्रतिक्रिया मात्र लोकांना अधिक भावली. राज ठाकरे यांनी या निमित्ताने सरकारला झापले. राज म्हणाले, ‘लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर हे ‘भारतरत्न आहेत. खूप मोठी माणसे आहेत. त्यांना अशा प्रकारे ट्वीट करायला सांगण्यासारख्या गोष्टी सरकारने करू नये. या मोठ्या माणसांची प्रतिष्ठा सरकारने अशा गोष्टींमध्ये पणाला लावू नये. शेतकऱ्यांच्या मागण्या हा सरकारच्या धोरणांचा विषय आहे, देशाचा नाही.’
पण खरे सांगा. सचिन काय चुकीचे बोलला? स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थांबार्ग म्हणा किंवा पॉप गायिका रिहाना म्हणा, यांचा भारतातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल काय अभ्यास आहे? काही माहिती नसताना ह्या सेलिब्रिटींनी ट्विटरवर ‘नरसंहार’ ह्या हाशटगच्या माध्यमातून भारताविषयी अपप्रचार केला होता. ह्या सेलिब्रिटींनी शेअर केलेले हे ‘टूलकीट’ खलिस्तानवादी गटाने तयार केल्याचे पोलीस तपासात उजेडात आले आहे. देशात अशांतता माजवण्याचा कृती आराखडा ह्या ‘टूलकीट’मध्ये आहे. दिल्ली पोलिसांनी तसा गुन्हा नोंदवला आहे. आता बोला. कोण कुणाच्या हातात खेळत आहे?