राज्यपालांनी १२ आमदारांची यादी रोखल्याने सरकार अस्वस्थ

Analysis News

राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी  आणि  महाविकास आघाडी  सरकार  यांच्यातील आतापर्यंतचा संघर्ष  लपून राहिलेला नाही.  आता तो वाढला आहे.   राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर  नियुक्त  करावयाच्या  १२  जागांना  कोश्यारी यांनी  अजून मान्यता न दिल्याने   आघाडीत प्रचंड अस्वस्थता आहे.  ही अस्वस्थता आणखी वाढणार आहे. कारण राज्यपाल ही यादी  मंजूर करण्याच्या अजिबात  मनस्थितीत नाहीत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना राम नाईक यांनीही अशाच प्रकारे  वर्षभर यादी रोखून  ठेवली होती अशी माहिती आहे.  कोश्यारीही   सत्ताधाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहतील  अशी लक्षणे आहेत.  हा संघर्ष कसे वळण घेतो याकडे  राज्याचे लक्ष लागले आहे.

      ‘आता राज्यपालांनी  अंत पाहू नये’ असे  थेट विधान  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्याने   चालू संघर्षात नवी ठिणगी पडली आहे.   विधानपरिषदेवर १२ आमदार  नियुक्त करण्याचा  अधिकार राज्यपालांना आहे. पण त्या नावांची यादी   सरकार तयार करते आणि राज्यपालांना पाठवते.  आतापर्यंतचे राज्यपाल  डोळे झाकून ही यादी मंजूर करीत आले आहेत.  मात्र  कोश्यारी हे वेगळे रसायन आहे. त्यातल्या त्यात ते  थेट  पंतप्रधान मोदी यांच्या खास मर्जीतले आहेत. त्यामुळे की काय त्यांनी ह्या फाईलला हात लावलेला नाही.  कुठली नावे पाठवायची याचे काही निकष आहेत.   राजकारणात नसलेल्या  पण कला, साहित्य, संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये असलेल्या दिग्गजांना  विधान परिषदेवर पाठवता येते.  सर्व खबरदारी घेत  सरकारने नावांची यादी पाठवून काही महिने झाले. पण कोश्यारी निर्णय घ्यायला तयार नाहीत आणि घेणारही नाहीत. १७१ आमदारांचे बहुमत असतानाही  नवे  १२ आमदार  नेमू शकत नाही म्हणून  सत्ताधाऱ्यांची चिडचिड  समजू शकते. अजितदादा म्हणाले, किती थांबायचे?

               मी तुम्हाला सांगतो. खूप थांबावे लागेल.  कारण राज्यपाल आणि सरकार यांच्यातले संबंध खूप  खराब झाले आहेत.  राज्यपालांवर टीका करायची एकही संधी  सत्ताधारी सोडत नाहीत. त्यामुळे कटुता वाढली आहे.   राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनीही  राज्यपालांना ठोकून काढले होते.   शेतकऱ्यांच्या मोर्चाला न भेटणारे राज्यपाल अभिनेत्री कंगना रनौट यांना मात्र भेटतात  असा चिमटा   पवारांनी काढला होता.  कोश्यारीही गप्प बसत नाहीत.   कविता राऊत  या खेळाडूला    सरकार नोकरी देत नसल्याच्या मुद्यावरून   ‘यात काहीतरी गडबड आहे’ असे म्हणत त्यांनी सरकारवरच प्रश्नचिन्ह लावले होते. ह्या  संघर्षाचा  स्फोट  कसा होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.  महाविकास आघाडीचे  काही नेते लवकरच राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती आहे.

0 Comments

No Comment.