देव नाही असे म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देव न मानणाऱ्यांना देव शिक्षा करीत नाही. पण सध्या जगभर धुमाकूळ घालणाऱ्या करोनाने त्याला न स्वीकारणाऱ्या काही कोटी लोकांना देवाघरी पाठवले आहे. करोनाला न मानणाऱ्या ब्रिटनमधील एका इसमाला करोनाने चांगलाच दणका दिल्याची बातमी सध्या सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.
करोना हे मेडिकल लॉबीचे कटकारस्थान आहे असा दावा करणाऱ्या लंडनमधील एकाचा करोनानेच बळी घेतला. मारी माथु नावाचा हा तरुण मास्क न घालता फिरायचा, सुरक्षित अंतरही तो पाळत नसे. करोनाने बाधा झाल्याचे निदान झाल्यानंतरही तो बाहेर फिरत असे. सात दिवसातच त्याचा मृत्यू झाला असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये करोनाने आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे. सरकारने कडक उपाय केले आहेत. तरीही बरेच लोक ऐकायला तयार नाहीत. आपल्या भारतातही थोडेफार असेच चित्र आहे. नऊ महिने उलटूनही करोना मरायला तयार नाही. भारतात दीड लाख लोकांचा करोनाने जीव घेतला आहे. २९ जानेवारी ह्या एका दिवशी देशात १३ हजार लोक बाधित झालेले आढळले. करोनाने बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असले तरी करोनाच्या केसेस संपत नाहीत हे चिंतेचे कारण बनत आहे. भारतात आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रतिबंधक लास टोचण्यात आली आहे. लसीकरणाचा हाच संथ वेग पाहिला तर भारताच्या १३५ कोटी लोकसंख्येला लस टोचायला किमान दोन वर्षे लागतील. सरकारने वेग वाढवला पाहिजे. लोकांनीही करोनाला गंभीरपणे घेतले पाहिजे. करोना संपला असे मानून अलीकडे लोक उघड्या चेहऱ्याने फिरताना पाहून पोटात गोळा उठतो. नगरमध्ये आपल्या एका कार्यक्रमात मास्क न घालता आलेले लोक पाहून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार भयंकर संतापले. ‘आता डोके फोडून सांगू का?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला. सरकारही सांगून सांगून थकले. अमिताभ बच्चनची ट्यून बंद झाली. पण धोका संपलेला नाही. आपल्याला करोनासोबतच जगायचे आहे हे ओळखून प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे.