ह्रदय विकाराचा झटका ही आता श्रीमंतांची मक्तेदारी राहिलेली नाही. चाळीशीनंतरच ह्रदय विकार मागे लागतो अशातलाही विषय राहिलेला नाही. हार्टच्या आजाराला आता वयाचेही बंधन राहिलेले नाही. कुणालाही आणि कधीही आता हार्टचा प्रॉब्लेम सुरु होऊ शकतो. त्यामुळे सावध व्हा. कुठलीही लक्षणे नसताना अचानक हार्टच्या झटक्याने मृत्यूने गाठल्याची उदाहरणे समोर येत आहेत. समाजाने काळजी करावी असे सिग्नल्स मिळू लागले आहेत.
नागपुरातील पत्रकारांचे नेते ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांच्या अवघ्या २६ वर्षे वयाच्या मुलाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी मृत्यू झाला. साहिल सकाळी घरातील बाथरूममध्ये गेला असताना तिथेच कोसळला. एक क्षणात होत्याचे नव्हते झाले. साहिल रामदेवबाबा महाविद्यालयात प्राध्यापक होता. उमेद जागविणारा मुलगा असा अचानक काहीही न सांगता निघून गेल्याने त्रिपाठी परिवारच नव्हे तर नागपूरचे पत्रकार जगत शॉकमध्ये आहे. आणखी एक ज्येष्ठ पत्रकार विनायक पुंड यांचा अवघ्या २७ वर्षे वयाचा पुतण्या थडीपवनीचा गौरव यालाही कालच मृत्यूने गाठले. पहाटे गौरवच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण अवघ्या तीन तासात खेळ खल्लास झाला. ह्र्द्याविकाराचा कुठलाही इतिहास नसलेले हे दोन तरुण अचानक काळाने ओढून नेले. असे का होतेय?
आयुष्यातील वाढता ताणतणाव याला जबाबदार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बदललेली जीवनशैली खलनायक ठरते आहे. कोरोना विषाणूच्या साथीने जग उलटेपालटे झाले आहे. सारे व्यवस्थित असतानाही माणसाची धावपळ सुरु होती. आता तर प्रत्येक क्षणाला टेन्शन आहे. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी माणूस टेन्शन घेतो आहे. हे टेन्शनच हार्टचा प्रॉब्लेम घेऊन येते. त्यातून मग वेगवेगळे आजार डोके काढतात. प्रसिध्द हार्ट सर्जन मुंबईचे नीतू मांडके यांची विकेट ह्र्द्यविकाराच्या झटक्यानेच गेली. आपल्याला हार्टचा झटका येणार आहे याचा अंदाज त्यांना आला नाही. माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली याला नुकताच झटका आला. फिटनेसमागे धावणाऱ्या सौरभचे वय फक्त ४८ आहे. सकाळी फिरायला जाणारेही हार्टने गेले आहेत. हार्टचा झटका येणार याची कुठलीही पूर्वसूचना मिळत नसते. अचानक तो डाव साधतो. मग यातून कसे सुटायचे? ‘लोड मत लो’ ह्या तीन शब्दात नामवंत डॉक्टर आर. बी. कळमकर यांनी सुटकेचा मंत्र सांगितला. कळमकर म्हणाले, ‘स्ट्रेस’ घेतल्याने धोका वाढतो. त्यामुळे कुठलेही टेन्शन घेऊ नका. कसे होईल, काय होईल याची काळजी न करता आयुष्याला सामोरे जा.