५७ वर्षे वयाचे नाना पटोले लंबी रेस का घोडा आहेत. मोठ्या मोठ्यांशी पंगा घेण्याचा त्यांना छंद आहे. स्वतःला सदा चर्चेत ठेवण्याचे कसब नाना पटोले यांना छान साधले आहे. पूर्वी ते बंडखोरीसाठी प्रसिध्द होते. अलीकडे कॉन्ग्रेसमध्ये आल्यापासून बरेच मवाळ झालेले दिसतात. नानांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. पण श्रेष्ठींनी त्यांना विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीत बसवले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाना हा फिल्डचा माणूस आहे. त्यांना सभागृह चालवायला बसवणे अनेकांना खटकले. नानाला संपवण्याचा डाव वाटला. काहींना यामागे शरद पवारांचा हात दिसला. विधानसभेचा अध्यक्ष कोण? हे सामान्य माणसाला लवकर सांगता येत नाही. त्याचे तसे कारणही नाही. मात्र आता नानांचे नाव मुंबई-पुणेकरांच्या तोंडी असते. नानांनी संधीचे सोने केले. त्यांनी सभागृह तर उत्तम चालवलेच, पण बाहेरही आपली छाप सोडली.
नानांची आज एवढी चर्चा करण्याचे कारणही तसेच आहे. विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरूपी कक्ष नागपुरात सुरु झाला आहे. पूर्वी सचिवालयाचे कार्यालय हिवाळी अधिवेशनापुरते नागपुरात येत होते. अधिवेशन संपले की हे ‘पक्षी’ उडून जात. हे कार्यालय नागपुरातही असले पाहिजे हा विचार नानांनी पटवून दिला. ही मोठी घटना आहे. भल्या भल्यांना जमले नाही ते नानांनी मोठ्या मुत्सद्देपणाने करून दाखवले. सरकारच्या महत्वाच्या खात्यांच्या सचिवाचे मुख्यालय नागपुरात आणले जाईल असे ‘नागपूर करारा’त लिहून आहे. पण एखाददुसरे मुख्यालय सोडले तर कुणीही नागपुरात आले नाही. ‘नागपूरला जा’ असे सांगण्याची कुण्या मुख्यमंत्र्याची हिंमत झाली नाही. महापुराच्या संकटातही उद्धव ठाकरे यांना विदर्भात यावेसे वाटले नाही. मुख्यमंत्र्यालाच यावेसे वाटत नसेल तर अधिकारी कशाला येतील? नागपूर म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा असा समज आजही नोकरशाहीत कायम आहे.
उपराजधानीच्या कुंकवावर विदर्भ खुश होता. नानांनी मुंबईला वाकवले. ५-२५ सरकारी बाबूंना मुंबईहून उचलणे हे सर्जिकल ऑपरेशनच आहे. ६० वर्षात कुण्या मंत्र्यासंत्र्याला जमले नाही ते नानांनी करून दाखवले. स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणण्याएवढेच हे मोठे काम आहे. विधानभवन सचिवालय आता नागपुरातही असणार आहे. नागपूर विधानभवन आता वर्षभर गजबजणार आहे. नागपूरची अवस्था ‘नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा’ अशी आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे चित्र थोडे सुधारले. पण विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे दोन आठवडे सोडले तर नागपुरात शुकशुकाट असतो. कधी कधी तर प्रश्न पडतो, नागपूर महाराष्ट्रात आहे की नाही? ही हवा आता बदलेल. विधानमंडळ सचिवालयच इथे मुक्कामाने राहणार असल्याने विदर्भातल्या आमदारांच्या मुंबईच्या फेऱ्या कमी होतील. आज अधिकारी बसायला तयार झाले. उद्या मंत्री बसतील. नागपूरचे महत्व वाढवणारा हा निर्णय आहे. ‘मुंबई नागपूरच्या जवळ येत आहे.’ सरकारमध्ये असतानाही विदर्भाला झुकते माप देता येते हे पटोले यांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिले. नानांच्या राजकीय इच्छाशक्तीला सलाम.
Moreshwar Badge :- Editor-in-chief of Hi Maharashtra
(Journalist by profession, senior political analyst and critique, served as a resident editor Lokmat.)