शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हल्ली सर्वाधिक व्होकल आहेत. रोज ते काहीतरी बोलत असतात आणि त्यावर वाद रंगत असतात. नुकतेच त्यांनी सोडून दिलेल्या एका पिल्लूवर कॉन्ग्रेसमध्ये गरमागरमी आहे. ‘भाजपला देश पातळीवर टक्कर द्यायची असेल तर युपीएचे नेतृत्व बदलून राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवारांना द्यावे’ असे संजय यांनी सुचवताच गांधी घराण्याचे निष्ठावंत तडकले. पण संजय काही चुकीचे बोलले नाहीत. पुढच्या निवडणुकीत कॉन्ग्रेसवर तशी पाळी येऊ शकते. सोनिया-राहुल गांधी यांना पवार कधीच प्रिय नव्हते. नाईलाज म्हणून वेळोवेळी त्यांनी पवारांना सोबत घेतले तो भाग वेगळा. पुढच्या निवडणुका २०२४ साली आहेत. त्यावेळी कॉन्ग्रेसला पवारांची गरज भासेल. राहुल गांधी गंभीर नसतात. आज सक्षम नेतृत्वअभावी कॉन्ग्रेस दिशाहीन आहे. उद्या देशव्यापी आघाडी बनवायची झाली तर राहुल यांच्या नेतृत्वात काम करायला ममतादिदिसारखे विरोधी नेते तयार होणार नाहीत. अशा परिस्थितीत पवारांकडे विरोधकांचे नेतृत्व येऊ शकते. पवारांचे वय ८० वर्षे असले तरी धावत असतात. आज सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची क्षमता असलेला त्यांच्याइतका अनुभवी नेता देशात दुसरा नाही. कुठलेही प्रयत्न न करता युपीएचे नेतृत्व पवारांकडे चालून येऊ शकते. फक्त अडचण आहे पवार ‘दुल्हा’ बनायला तयार होतील?
राहुल पुन्हा अध्यक्ष व्हावेत ही पंतप्रधान मोदी यांची इच्छा आहे. राहुलबाबा आहे तोपर्यंत आपल्याला अडचण नाही असे मोदींना वाटते. पण कॉन्ग्रेसच्याच बहुतांश नेत्यांना राहुल नको आहेत. हे नेते राहुल यांच्या लहरी राजकारणाला कंटाळले आहेत. उघडपणे कुणी बोलत नाही. पण ह्या नेत्यांशी पवारांचा चांगला याराना आहे. हे नेते पवारांशी दोस्ती करू शकतात. पवारांना कॉन्ग्रेसमध्ये आणण्यासाठी हालचालीही सुरु झाल्या आहेत. कॉन्ग्रेसचे एक निष्ठावंत पुण्याचे माजी आमदार उल्हास पवार यांनी तर तसा लेख लिहिला. पवारांनी कॉन्ग्रेसमध्ये यावे असे लिहून खळबळ उडवून दिली. २०२४ साल जसजसे जवळ येईल तसतसा हा दबाव वाढेल. पवार गेली ६० वर्षे राजकारणात आहेत. त्यांनी सारे भोगले. पण पंतप्रधान होण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. कॉन्ग्रेसचे अध्यक्षही होता आले नाही. राजीव गांधी यांच्या निधनानंतर पवारांनी पंतप्रधानपदालाच धडक मारली होती. ती उडी कमी पडली. पुढे दर काही वर्षांनी सवतासुभा बदलण्याच्या प्रवृत्तीने पवार मागे पडले. त्यांच्याबाबतीत विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे. पवार केव्हा कशी पलटी मारतील याचा नेम नाही. २०१४ साली शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. सध्या भाजपला दूर ठेवण्यासाठी त्यांनी शिवसेनेसोबत संसार थाटला आहे. पवार अजूनही आम्हाला कळले नाहीत असे त्यांचेच सहकारी म्हणतात. मोदी त्यांना आपला गुरु मानतात. पवार नेमके कोणाचे हे देशाला कोडे आहे. त्यामुळे विरोधकांनी गळ घातली, गांधी घराणे तयार झाले तरी पवार काय पलटी मारतील काही नेम नाही.
मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांमध्ये असंतोष आहे. पण तो पेटवणारा कुणी नाही. त्यामुळे ‘मोदी है तो सब मुमकिन है’ असे सुरु आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने नोटीस दिल्यानंतर ह्या असंतोषाचे नेतृत्व करण्याची संधी पवारांना चालून आली होती. पण कोंडीत सापडलेल्या सरकारला पवारांनी चार दिवसांनी सोडून दिले. पवारांचे नफातोट्याचे काय गणित असेल? विरोधकांची अडचण नाजूक आहे. एकेकाळी जयप्रकाश नारायण, अण्णा हजारे सरकारच्या विरोधातला असंतोषाचा चेहरा बनले आणि दिल्लीचे तख्त उलटले. आज असा असंतोषाचा चेहरा होऊ शकेल असा नेताच डोळ्यापुढे येत नाही. कोण मोदींशी पंजा लढवणार?