राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद लांबल्याची जोरदार चर्चा आहे. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल अशी चर्चा सुरु झाल्याने अजितदादा पुन्हा ‘नॉट रिचेबल’ होण्याची भीती वाढली आहे. नागपूर अधिवेशन १६ डिसेंबरला सुरु होऊन २२ डिसेंबरला संपत असल्याची माहिती आहे. तो पर्यंत अजितदादांना टांगून ठेवणार की काय ह्या शंकेने त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत.
विधानसभेचा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ही दोन पदे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला गेले आहे. उद्धव सरकारचा पहिल्या टप्प्यातील विस्तार येत्या ३ किंवा ५ तारखेला होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षपदाची उद्या निवडणूक होत आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपद तूर्त रिकामे ठेवण्यामागे राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांचा काय डाव आहे हे बाहेर आलेले नाही.