‘पार्टी विथ डिफरंस’ म्हणून भाजपची ओळख आहे. भाजप पक्षशिस्तीला सर्वोच्च महत्त्व देतो. पण सध्या जे सुरू आहे ते भाजपच्या परंपरेला धरून नाही. प्रत्येक पक्षात नाराज लोक असतात. भाजपमध्येही होते. पण ते बाहेर बोलत नसत. राज्याची सत्ता हातून गेल्यानंतर नाराजांनी डोके वर काढले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चार दिवसांवर आले असताना भाजपचा ओबीसी चेहरा पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील परळीजवळ गोपीनाथगडावर मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. याचा काय अर्थ घ्यायचा?
‘आपण भाजप सोडणार नाही’ असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. पण ‘माझा भरवसा नाही’ असे ह्या मेळाव्याला आलेले दुसरे असंतुष्ट नेते एकनाथ खडसे म्हणाले. भाजपमध्ये राहणार; पण पक्षशिस्त पाळणार नाही असा हा मामला आहे. कुठलाही पक्ष असा चालत नसतो. पंकजा संघर्षयात्रा काढणार आहेत. पण संघर्ष कोणा विरोधात हे त्या सांगत नसल्या तरी ते उघड आहे. देवेंद्र फडणवीस ह्या एका नेत्याला त्यांना टार्गेट करायचे आहे. ते शक्य नाही. पंकजा यांना देवेंद्र नको असतील; पण मोदी-शहा यांना हवे आहेत. त्यामुळे लगेच नाही; पण पुढेमागे पंकजा शिवसेनेत जातील. खडसे राष्ट्रवादीत घुसू पाहात आहेत. पण ह्या दोन्ही पक्षांत आधीच दिग्गज नेते आहेत. त्यांनाच द्यायला मंत्रिपदं कमी पडत असताना उद्धव किंवा पवार ही नवी डोकेदुखी कशाला विकत घेतील?