विधानसभेचा आखाडा आणि उद्धवनीती

Entertainment Maharashtra Others

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवसाचा मूड पाहिला तर विधानसभेचा आखाडा होतो की काय अशी भीती वाटली. नागपुरात थंडी आहे. पण विधानभवन तापले आहे. राहुल गांधी विधानसभेचे सदस्य नाहीत. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल त्यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे भाजप आमदारांच्या हाती आयते हत्यार आले आहे.

विधानभवनात आत-बाहेर सावरकरच सावरकर चालले. ‘मी पण सावरकर’ असे लिहिलेली भगवी टोपी घातलेल्या भाजप आमदारांनी पायऱ्यांवर बसून नारेबाजी केली. त्याला उत्तर म्हणून की काय महाआघाडीतील काही आमदार पांढरीशुभ्र गांधी टोपी घालून आल्याने ‘टोपीयुद्ध’ रंगले. सावरकर यांच्याबद्दलची काही वक्तव्ये पटलावरून काढल्याने संतप्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘ही महाराष्ट्राची की ब्रिटिशांची विधानसभा?’ असा सवाल केला. राहुल माफी मागेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे अधिवेशनाचे उरलेले पाच दिवसही गोंधळात बुडण्याची चिन्हे आहेत. सावरकर संपले तर शेतकरी नुकसानभरपाई आणि कर्जमाफीचा विषय आहेच.गोंधळातही सत्तापक्षाने काही कामकाज उरकून घेतले. नवे सरन्यायाधीश मूळ नागपूरचे शरद बोबडे यांचे सभागृहाने अभिनंदन केले. गोंधळातच १६ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर झाल्या. राज्याची आर्थिक तब्येत चांगली की वाईट ह्यावर वाद असला तरी कुठल्याही सरकारला कर्ज काढणे सक्तीचे झाले आहे असे दिसते. आधीचे युती सरकारही वेळोवेळी पुरवणी मागण्या घेऊन समोर येत होते. उद्धव सरकारचीही त्यातून सुटका नाही. पण शेतकऱ्यांना मदतीसाठी फक्त ७५० कोटी रुपये ठेवल्याची टीका विरोधकांनी केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे २३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आकडा फडणवीस यांनी मीडियाला दिला होता. ‘सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देऊ’ असे वचन उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत दिले होते. पण अजून शेतकऱ्यांच्या खात्यात छदाम पडला नाही.

शेतकरी आणि सावरकर ही यावेळी भाजपने हेरलेली हुकमी हत्यारं आहेत. पण ‘अरे’ला ‘कारे’ करणारी शिवसेना आज सभागृहात शांत बसली होती, हे कोडे आहे. सावरकरांसारखा विषयही ‘वाघांचे’ रक्त तापवू शकला नाही. भाजपने कितीही हंगामा केला तरी आपण गडबड करायची नाही अशी रणनीती उद्धव यांनी आखलेली दिसते. त्यामुळे उद्धव-फडणवीस जुगलबंदी पाहायला मिळेल ह्या आशेने आलेल्या मीडियाची निराशा झाली.

आजच्या दिवसाचे ‘मॅन ऑफ द मॅच’ फडणवीस राहिले. त्यांच्या जोडीला विधान परिषदेत भाजपने प्रवीण दरेकर यांना विरोधी पक्षनेते म्हणून देऊन सत्ताधाऱ्यांना धक्काच दिला. सुजितसिंह ठाकूर यांचे नाव ठरल्याची चर्चा होती. सुरेश धस, भाई गिरकर असे अनेक दिग्गज शर्यतीत होते. पण शिवसेना, मनसे असा प्रवास करून आलेल्या दरेकर यांनी बाजी मारली. भाजपचे महत्त्वाचे निर्णय रात्री होतात, हे पुन्हा एकदा दिसून आले.

0 Comments

No Comment.