करोनाचे संकट वाढत असल्याने काय करायचे या संबंधात विचार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. पण निर्णय झाला नाही. उद्या करोनासाठीच्या टास्क फोर्सची बैठक आहे. साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन दोन दिवसात निर्णय करतो असे मुख्यमंत्री म्हणाले. हातावर पोट असणाऱ्यांना काय मदत देता येईल तेही सरकार सांगणार आहे. निर्णय झाला नसला तरी लॉकडाउन शिवाय पर्याय नाही. जनतेला कळ सोसावीच लागेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकूण सूर पाहता राज्यात १५ दिवसांचा कडक लॉकडाउन येतो आहे.
मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच सांगितले की, रुग्ण वाढत आहेत. करोनाची साखळी तोडवीच लागेल. नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. करोनाचा एक पेशंट २५ जणांना बाधित करतो. आज आपल्याकडे पाच पेशंट आहेत. रोज त्यामध्ये ५० हजाराची भर पडते आहे. त्यामुळे कडक निर्णय तातडीने करावाच लागेल.
मुख्यमंत्र्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपही नरमलेला दिसला. दोन्ही कॉन्ग्रेसने मुख्यमंत्री करतील ते मान्य राहील असे सांगितले. विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी घाईघाईने सरकारने काही करू नये. काय करणार ते आधी लोकांना सांगा. योजना तयार करून लोकांपुढे या. यात गरीबांचा, व्यापाऱ्यांचा विचार व्हावा. गरिबांना काही पैशाची मदत सरकारने दिली पाहिजे.