‘गां.. वृत्तीच्या लोकांना करोना होतो’ असे संभाजी भिडे गुरुवारी म्हणाले आणि शुक्रवारी म्हणजे दुसऱ्याच दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांना करोना झाला. याला तुम्ही काय म्हणाल? योगायोग की कठोर सत्य? संभाजी भिडे काय म्हणतील? मोठा प्रॉब्लेम आहे ह्या लोकांचा. त्या कीर्तनकाराने मुले काढायच्या तारखा सांगितल्या तर कोर्टबाजी झाली. ह्या भिडेंशी मात्र कोणी खाजवत नाही. भिडेगुरुजी हे मुळचे सांगलीचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते. १९८० मध्ये त्यांनी संघ सोडला आणि स्वतःचे ‘शिव प्रतिष्ठान’ सुरु केले. शिवाजी, संभाजी यांच्या विचारांचा प्रसार आपण करतो असा त्यांचा दावा आहे. हे काम होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण भिडे वादग्रस्त वक्तव्यासाठीच प्रसिध्द आहेत. त्यांचा ‘आंबा फॉर्म्युला’ मागे खूप गाजला. आता ‘करोना हा रोग नाही. मानसिक रोग आहे. करोनाने मरणारी माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत’ असे अकलेचे तारे त्यांनी तोडले. त्यांचा हा व्हिडियो जोरात व्हायरल झाला. भिडे यांचे वय ८७ वर्षे आहे. या वयातही त्यांच्यातली ऊर्जा तरुणांना लाजवणारी आहे. शर्ट-धोतरातले भिडे ‘लालू यादव’ नाहीत. नरेंद्र मोदी त्यांचे खास चाहते आहेत. त्यावरून ओळखा, की हा माणूस किती भारी असेल. करोनाने जग हैराण आहे, किड्यामुंगीसारखी माणसे मरत आहेत. पण भिडे म्हणतात, हा रोगच नाही. ते काहीही बोलले तरी लोक त्यांना गंभीरपणे घेत नाहीत. गमतीने घेतात. मोहन भागवतांनीही गमतीने घेतले असेल. भागवत ७० वर्षाचे आहेत. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास सुरु झाला. टेस्ट केली तर पॉझीटीव्ह आली. नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटलमध्ये ते भरती आहेत. करोना लहान-मोठा असा भेदभाव करीत नाही, हेच खरे. करोनाच्या मनात आले तर तो भिडे यांनाही सोडणार नाही. तेव्हा भिडे काय म्हणतील?