माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ,
मुंबई .
महोदय ,
साहेब मुख्यमंत्री म्हणून आपण अतिशय उत्तम कारभार करीत आहात हे सर्वप्रथम आपणास सांगू इच्छितो. उत्तम , सद्गुणी , नम्र , शालीन मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आपली नोंद होईल यात तिळमात्र शंका नाही . आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना .
कणखरपणा दाखवा
पत्र लिहिण्यास कारण की , साहेब आपण थोडा कणखरपणा दाखवा . ठकास महाठक होऊन आपण राज्यकारभार करावा इतकीच आपल्याकडून अपेक्षा ठेवत आहे . संपूर्ण मराठी माणूस ( भाजप आणि गुजराती मराठी सोडून ) आपल्या सोबत आहे . काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेना या तीन प्रमुख पक्षांचे करोडो कार्यकर्ते आपल्यासोबत असताना तुम्ही इतके का बॅकफुटवर खेळताय याचीच आम्हाला काळजी आणि चिंता वाटतेय . साहेब , इतक्या करोडो कार्यकर्त्यांचे बळ हे कोणत्याच मुख्यमंत्र्याला आजपर्यंत भेटले नाही . तुम्ही एकमेव मुख्यमंत्री आहात ज्याला महाराष्ट्रातील तीन बलाढ्य राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे आणि जे काही मराठी कार्यकर्ते इतर छोट्या-छोट्या राजकीय पक्षात आहेत त्यांचा सुद्धा मराठी म्हणून तुम्हालाच पाठिंबा आहे . या पाठिंब्याचे एकमेव कारण म्हणजे या सगळ्यांचा असलेला भाजपा विरोध . साहेब त्या सर्व मराठी कार्यकर्त्यांची एकच कॅच लाईन आहे की , महाराष्ट्रात कोणाचेही सरकार चालेल , पण भाजपा नको . साहेब इतका प्रखर विरोध असताना तुम्ही का म्हणून डगमगताय ? का म्हणून तुमच्यात इतकी हतबलता दिसत आहे ?
नक्षल्याचा हल्ला
नक्षल्यांच्या हल्ल्यात आमचे २२ जवान शहीद झाले .मात्र अमित भाई शहा हे तामिळनाडू , आसाम , केरळ याठिकाणी सिनेअभिनेत्री बरोबर निवडणुकांच्या रोड रॅलीज करीत होते . त्या सर्व रॅलीज संपल्यावर चोवीस तासानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली . काहीतरी झालंय , खरं आहे का ते ? असा अविर्भाव होता त्यांचा .एकाही प्रामाणिक पत्रकाराने / मीडियाने त्यांना त्याबद्दल प्रश्न विचारला नाही .
लाचार मीडिया
मुंबईच्या 26 /11 च्या हल्ल्याच्या वेळी तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी एका दिवसात दोन वेळा कपडे बदलले म्हणून पत्रकारांनी / मिडीयाने त्यांना सळो कि पळो करून सोडले होते . त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते . आत्ताचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई सिनेअभिनेत्री बरोबर मस्त मस्त निवडणूक रोड रॅलीज करीत होते . चोवीस तास उलटून गेले तरी त्यांना नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी वेळ मिळाला नाही . तेव्हा त्या लाचार, भ्रष्ट , लाळघोट्या मीडियाला / पत्रकाराला अमित भाईंना प्रश्न विचारण्याची हिंमत होत नाही ?
यापुढे पत्रकार परिषद घेऊ नका
अशा पळपुटेपणा करणाऱ्या लाचार मिडीयाला तुम्ही का म्हणून किंमत देता ? मी तर म्हणतो साहेब तुम्ही पत्रकार परिषद घेऊच नका . मोदीसाहेब जर गेल्या सात वर्षात एकही पत्रकार परिषद घेत नसतील आणि त्या गोष्टीला मीडियाचा कोणताही आक्षेप नसेल तर आपण अशाबाबतीत मोदी साहेबांचे अनुकरण का करू नये ?
परमविरसिंगला जागा दाखविणे गरजेचे होते
साहेब तुम्ही त्या परमविरसिंगला मोकळे सोडलेच कसे ? जो माणूस राज्य शासनाच्या विरोधात जातो म्हणजेच तो महाराष्ट्रद्रोही ठरविला गेला पाहिजे . या केंद्र सरकारच्या काळात जो कोणी सरकार विरोधात बोलतो त्याला ते राष्ट्रद्रोही ठरवितात . त्याच न्यायाने एक अधिकारी राज्य शासनाविरोधात बोलतो म्हणजे तो महाराष्ट्रद्रोही नाही का ? एका फडतुस आयपीएसची हिंमत होतेच कशी राज्य शासनाच्या विरोधात जाण्याची ? लोकनियुक्त शासनाच्या वर त्याची लायकी आहे का ? स्वतःची अटक वाचण्यासाठी ज्या दिवशी त्याने ते पत्र ( गोदी मीडिया च्या भाषेत लेटर बॉम्ब ) दिले त्याच दिवशी त्याला सक्तीच्या रजेवर पाठवायचे होते . आयएएस आणि आयपीएस यांना निलंबित आणि बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्र सरकारला जरी असला तरी तुम्ही तसा प्रस्ताव केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना पाठविणे गरजेचे होते . ठाकरे सरकार कणखर सरकार आहे हा मेसेज या निमित्ताने संपूर्ण देशाला गेला असता . एक फालतू आयपीएस राज्य शासनाला धमकी देतो , गृहमंत्र्यांवर आरोप करतो आणि आपले ठाकरे सरकार गर्भगळीत होऊन गप्प बसते . ही प्रशासन चालविण्याची कोणती पद्धत आहे साहेब ?
रेबॉनचा गॉगल … निलंबन
अहो साहेब , काही वर्षापूर्वी एक बातमी वाचली होती .मोदींच्या एका दौऱ्यामध्ये एक स्थानिक आयपीएस प्रोटोकॉल म्हणून विमानतळावर त्यांचे स्वागत करायला हजर राहिले होते . त्यावेळी त्या आयपीएसने रेबॉनचा गॉगल घातला होता . त्याने गॉगल घातल्याने प्रोटोकॉलचा भंग केला म्हणून त्याला निलंबित करण्यात आले होते . साहेब अशावेळी वाटते की , प्रशासन चालवावे तर ते संघी मंडळीनीच . कोणाला दाबून ठेवावे ? कोणाला ठेचावे ? हे त्यांना पक्के ठाऊक आहे . आता साहेब तुम्ही पण इतके दिवस या संघी लोकांबरोबरच काढलीत ना ? तर तुम्हीसुद्धा थोडेफार शिकून घ्यायचे होते त्यांच्याकडून . पण तुमचा पडला सरळ स्वभाव . याचा त्यांनी बरोबर फायदा घेतला .
राज्य पातळीवरील अँटी करप्शन
साहेब केंद्राकडे सीबीआय , इन्कम टॅक्स , ईडी , एनआयए असेल तर तुमच्याकडे सुद्धा राज्य पातळीवर अँटी करप्शन विभाग आहे ना . द्या ना दोन-चार चौकशा लावून त्या परमवीर सिंगच्या विरोधात . काढा त्याच्या संपत्तीचे विवरण आणि ठेवा जनतेसमोर .
आय पी एस
आयपीएस काय धुतल्या तांदळासारखे असतात की काय ? मध्यंतरी निवृत्त महिला आयपीएस मीरा बोरवणकर मॅडम यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की ,सर्व पोलीस ठाण्यात पैसे खातात . हो सर्व पोलिस ठाण्यात पैसे खातातच . इथे भ्रष्टाचाराचे समर्थन नाही . परंतु तुम्ही असा एक आयपीएस दाखवा की जो पैसे खात नाही . कोणत्या नैतिकतेच्या गोष्टी सांगतात ह्या निवृत्त महिला आयपीएस ? आयपीएस लोकांनी प्रामाणिकपणाचा ठेका घेतला असा गोड गैरसमज करून घेतला की काय बाईसाहेबांनी ? सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस पैसे खात असतील तर एअरकंडिशन गाडीत आणि कार्यालयात बसून आयपीएस फक्त बिल्डर आणि उद्योजक यांच्यासोबत पार्ट्या झोडण्याचे कर्तव्य पार पाडतात की काय ? पोलीस खात्याची दुर्दशा होण्यास ही आयपीएस मंडळीच जबाबदार आहेत . समाजातील तळागाळातील लोकांना विचारा पोलिस कर्मचारी / अधिकारी दिवस-रात्र एक करून कसे समाजाचे रक्षण करतात ते . तुमच्यासारख्या आयपीएस लोकांना ते दिसणार नाहीत . कारण आयपीएस म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस नसून इंडियन प्रिन्स सर्व्हिस (भारतीय राजकुमारांची सेवा ) अशी आहे . असो .
चौकशी चालू करा
साहेब , त्या परमवीरसिंग आणि कुटुंबियाच्या मागे अँटी करप्शनच्या चौकशा लावा . त्यांना राज्य शासनाची ताकद कळलीच पाहिजे .
छत्रपतींचा घात
साहेब हे आयएएस आणि आयपीएस म्हणजे शिवकालीन पेशवे . पेशव्यांच्या घोडचुका पाठीशी घातल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा घात झाला . साहेब , शिवशाही संपून पेशवाई कधी आली हे कोणाला समजलेच नाही . मुंबईमध्ये सचिवालय नसून मंत्रालय आहे हे दाखविण्याची वेळ आली आहे . तुम्ही जर कणखर भूमिकेतील सरकार चालविले नाही तर लक्षात ठेवा उद्या – परवा हीच मंडळी तुम्हाला चौकशीला बोलावतील . संभाजी महाराजांचा घात याच प्रवृत्तीने केला . संभाजी महाराज सुद्धा तुमच्यासारखे दयाळू , प्रेमळ , नम्र शासक होते . त्यांचा पेशव्यांनी फायदा घेतला . संभाजी महाराजांना बदनाम करून टाकले . आता कितीतरी वर्षांनी संभाजी महाराजांचे खरे रूप जनतेसमोर आले आहे . परंतु महाराष्ट्र राज्याचे भयंकर नुकसान झाल्यावर .
तुमच्या प्रेमाखातर दोन शब्द
साहेब आम्ही व्यक्तिशः शिवसैनिक नाही . परंतु तुमच्यासारख्या गुणी माणसाकडे पाहिल्यावर आम्ही तुमचे फॅन झालो . तुमच्या शिवसैनिकां पेक्षाही आम्ही तुमच्यावर जास्त प्रेम करायला लागलो . त्या प्रेमाखातर तुम्हाला दोन शब्द लिहीतोय .
यापुढे मंत्र्यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही
साहेब, यापुढे कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा नाही . सीबीआय / इडी या पोपटांनी आपल्या मंत्र्यांना तुरुंगात टाकले तरीसुद्धा त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा नाही . तुरुंगात बसून तो मंत्री आपल्या खात्याचा कारभार पाहिल . एक नवीन प्रथा आपण देशात तयार करू. एक तडीपार माणूस देशाचा गृहमंत्री होऊ शकतो म्हणजे इतकी उच्च पातळीची नैतिकता या देशात पाळली जात असेल तर खोट्या गुन्ह्यात अडकविलेला आमच्या महाराष्ट्राचा मराठी मंत्री तुरुंगात राहून त्यांच्या खात्याचा कारभार का नाही चालवू शकत ?
न्यायालयाचे आदेश
आणि हो साहेब त्या उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आपण किती गांभीर्याने घ्यायचे ? ते माजी सरन्यायाधीश आणि सध्या भाजपा खासदार गोगई महाराज काय म्हणाले माहित आहे ना ? ते म्हणाले मी न्यायालयात जाणार नाही कारण न्यायालयात न्याय मिळत नाही. ज्या परमविरसिंगच्या अर्जावर पहिल्या दिवशी उच्च न्यायालयाने परमविरसिंगचे कपडे फाडले . त्यानंतर दोन दिवस सुट्टीचे गेल्यानंतर असे काय मतपरिवर्तन झाले की सीबीआय चौकशीचे आदेश दिले गेले ? सर्वसामान्य लोकांच्या मनात आलेल्या या बाळबोध प्रश्नावर कोणीच बोलू नये ? ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यां अनिल देशमुख यांना न्यायालयात बोलावून त्यांची बाजू ऐकून घेतली का ? नैसर्गिक न्यायाचे तत्त्व अंमलात आणले गेले का ?
सध्या जो तो उठतो आणि सर्वोच्च न्यायालयात जातो . खालचे न्यायालय त्यांना दिसतच नाही . अर्णब गोस्वामीने अशी सवय लावली सर्वांना . त्याने सुप्रीम कोर्टाचे मेट्रोपोलिटन कोर्टच करून टाकले हो . सुप्रीम कोर्टाने सुद्धा किती तात्काळ दखल घेतली त्याची ? सर्वसामान्याचे खटले वर्षानुवर्षे खितपत पडले आहेत . न्यायालयाविरोधात काही लिहिले , बोलले तर तो कोर्टाचा अवमान . आणि कोर्टाने नियमांची पायमल्ली केली तर त्या विरोधात काही लिहावयाचे नाही , बोलावयाचे नाही . धन्य ही व्यवस्था . क्षमा करा न्यायदेवता .
शेंगा निवडणारे हर्षवर्धन
यापुढे कोरोनाच्या बाबतीत केंद्र सरकार आपल्या राज्याला मदत करत नाही हे तुम्ही तुमच्या भाषेत ठासून सांगत चला . भारतातील करोना बाधित लोकांच्या मृत्यूची जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा ज्यांनी द्यावयास पाहिजे होता ते केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे सुद्धा सध्या नाक वर करून महाराष्ट्राला शहाणपणा शिकवायला लागलेत . गेल्या वर्षी कोरोनाच्या सुरवातीच्या काळात या हर्षवर्धन महाशयांना करोनाचे गांभीर्यच समजले नव्हते . त्यावेळी त्यांचे त्यांच्या पत्नी बरोबर घरात शेंगा निवडत असलेले फोटो समाज माध्यमांवर फिरत होते .आणि हे हर्षवर्धन आम्हाला शिकविणार . साहेब ,उगाच केंद्राच्या बाजूने गोड गोड बोलू नका . केंद्राच्या विरोधात बोलायचे नाही असे ठरविले आहे का तुम्ही ? घाबरता का तुम्ही ? साहेब परत सांगतो , आम्ही सर्व पक्षांचे मराठी माणूस आपल्या सोबत आहोत . ठकास महाठक होऊनच बोला . काम करा . घाबरू नका .
शाखाप्रमुखाशी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी बोला
कोणतेही सरकारी नियम करताना तुम्ही तुमच्या शाखाप्रमुखाशी आणि सामान्य कार्यकर्त्यांशी बोलून घ्या . रस्त्यावरील वास्तव ते तुम्हाला सत्य सांगतील . ते समजून घ्या . एसीमध्ये बसणाऱ्या आयएएस लोकांच्या नादी लागू नका . ते पेशवे आहेत .
व्यापाऱ्यांना मोदी चालतात ठाकरे नाही
व्यापाऱ्यांच्या धमकीला बिलकुल घाबरून नका . ते तुमचे कधीही मतदार नव्हते . मोदींनी चार तासांची मुदत देऊन केलेला लॉकडाऊन त्यांना चालतो . थाळ्या, डबे वाजविणे , दिवे लावणे हे त्यांना चालते कारण ते मोदींनी सांगितले आहे . मोदींसाहेबांच्या धोरणांमुळे सगळ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे हे समजून उमजून ते विसरतात . गुजरात हायकोर्टाने गुजरातमध्ये लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले हे व्यापारी विसरतात . हे परप्रांतीय व्यापारी रस्त्यावर उतरून आमच्या सरकारला धमकी देतात . साहेब , यांच्यावर गुन्हे दाखल करा . इकडे धंदा करणार आणि गुणगान मोदींचे गाणार . नाही चालणार यापुढे . राफेलच्या महाभयंकर रकमेच्या दलाली विरोधात हे व्यापारी रस्त्यावर उतरणार नाहीत . परंतु लॉकडाऊनच्या वेळेत खाली वर जरी काही झाले तर हे रस्त्यावर उतरणार . अरे वा ! मूर्ख समजता का आम्हाला ?
आयएएस पेशवे
साहेब , हे आयएएस पेशवे निर्णय कसे घेतात याचे एक गमतीदार उदाहरण पहा . रेल्वेच्या एका डब्यामध्ये बसण्याची क्षमता जितकी आहे तितकेच प्रवासी डब्यात घेतले जाणार असा आदेश त्यांनी काढला . अरे बाबांनो कर्जत स्टेशनवरून सुटणारी लोकल कर्जतमध्येच क्षमतेपेक्षा चौपट भरते .म्हणजे तिने कोणत्याही स्टेशनवर न थांबता सरळ सीएसएमटीला उतरायचे का ? मधल्या स्टेशनवरील प्रवाश्यानी गोट्या खेळत बसायचे का ? अशा अव्यवहारीक सूचना देणारा आयएएस कधी लोकलमध्ये बसला होता का ? असो .
संघी रश्मी शुक्ला
साहेब , त्या संघी रश्मी शुक्ला यांची चौकशी ताबडतोब पूर्ण करून त्यांच्यावर आणि संबंधीत लोकांवर गुन्हा दाखल करा . उगाच त्या निवृत्त होईपर्यंत बसू नका . स्त्री दाक्षिण्य जिथे दाखवायचे तिथेच दाखवा . उगाचच औदार्य नको .
एन आय ए ..
आता या एन आय ए ची कार्यपद्धती पहा . दारुगोळा , बॉम्ब , स्फोटके या संबंधात होणाऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी यांची स्थापना झाली . परंतु हे बसलेत चिंधी काम करीत . सचिन वाझे कडे किती गाड्या / सायकली आहेत ? त्याच्याकडे पैसे किती आहेत ? त्याला पत्र लिहिण्यासाठी पेन आणि पेपर पुरव . त्या पत्राची अनेक झेरॉक्स प्रती काढून ते माध्यमांना द्या आणि या सर्व फजिलपणाला तुम्ही जनतेने तपास समजून घ्या . ” ध ” चा ” मा ” करण्याची पेशवाही तपास पद्धत यांनी अवलंबलेली आहे . आमच्या पोलीस स्टेशनला त्या सचिन वाझेला जर सकाळी ताब्यात दिला असता तर दुपारपर्यंत ज्यांनी त्याला जिलेटीन दिले त्याला आमचे शिपाई घेऊन आले असते आणि संध्याकाळी त्या परमविरसिंगला सुद्धा डिटेकशन रुम मध्ये बसविले असते . एन आय ए तुम्ही लोकांना मूर्ख समजता का रे बाबांनो ??
ममतादीदी
त्या ममतादीदीकडे पहा .मोदी शहा जोडीला सळो कि पळो करून सोडलंय त्या वाघिणीने . तुम्ही ही वाघ आहात . कशाला घाबरता या लोकांना ? साहेब तुम्ही कणखर व्हा आणि महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्र्यांची यादीत पहिला क्रमांक मिळवा . तुम्ही प्रबोधनकारांचे वाटेने जात आहात हेच या संघी लोकांना नकोसे झाले आहे . त्यांना त्यांचे तथाकथित हिंदुत्व पाहिजे आहे .परंतु आम्ही सर्व मराठी माणसं आपल्यासोबत आहोत .
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय भीम!
आपला एक चाहता मराठी माणूस ,
ऍड .विश्वास काश्यप ,
माजी पोलिस अधिकारी ,
मुंबई .