महाराष्ट्रात करोना धुमाकूळ घालतो आहे. आणि इकडे लशी संपत चालल्या आहेत. लस नाही म्हणून अनेक केंद्रे बंद पडली आहेत. नागपूर, मुंबईसारख्या शहरात तर फक्त दीड दिवसाचा साठा आहे. रेम्डेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा आहे. ते काळ्या बाजारात तिप्पट भावाने विकले जात आहे. सरकारी-खासगी रुग्णालयांमधला सावळागोंधळ संपायला तयार नाही. नागपुरात बेड न मिळाल्याने एक इसमाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. पेशंटचे हे हाल सुरु असताना सरकारे आपसात भांडत आहेत. ‘सध्या दररोज आम्ही साडे चार लाख लोकांचे लसीकरण करतो. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख लशी द्या’ अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे आज केली. त्यावरून राजकारण पेटले. महाराष्ट्रात सध्या साडे चार लाख सक्रीय रुग्ण आहेत. गुजरातची लोकसंख्या आमच्या निम्मी असताना त्यांना ३० लाख लशी आणि आम्हाला फक्त साडे सात लाख लशी कशा मिळतात असा खडा सवाल टोपेंनी केला. राज्यात भाजपचे सरकार नाही त्याचा ताप लोकांना भोगावा लागत आहे. महाराष्ट्राला करोना सांभाळता येत नाही म्हणून ते राजकारण करीत आहेत असे टीकास्त्र केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सोडले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव सरकार मीडियापुढे ओरडा करते. केंद्राशी बोलले पाहजे. राज्याच्या दबंगगिरीचा लगेच फायदा झाला. महाराष्ट्राचा आठवड्याचा कोटा वाढवून मिळाला. आता आठवड्याला १७ लाख लशी मिळतील. पण त्या कशा वाटायच्या? कोणाला वाटायच्या याचे नव्याने धोरण ठरवायची वेळ आली आहे. कामानिमित्त बाहेर फिरणारे तरुण २० ते ४० वयोगटातील आहेत. पण त्यांना लशीचे मिळत नाहीत. अमेरिकेने १८ वर्षावरील तरुणांना लस टोचायला सुरुवात केली आहे. आपण व्यवहार्य केव्हा होणार? हा खरा प्रश्न आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशात आतापर्यंत फक्त साडे आठ कोटी लोकांना आपण लस टोचू शकलो. या वेगाने अखेरच्या माणसाला लस टोचायला काही वर्षे लागतील. असा विचार करायला कोणाला वेळ आहे. उलट पाकिस्तानला आपण किती लशी पाठवल्या याचे आकडे सरकार छाती फुगवून सांगते.
करोनाने जगाला भंडावून सोडले आहे. पण शिव प्रतिष्ठानचे बॉस संभाजी भिडे यांचे मत मात्र वेगळे आहे. संभाजी म्हणतात, करोना हा मुळात रोगच नाही. मानसिक रोग आहे. करोनाने मारतात ती माणसे जगायच्या लायकीची नाहीत. सांगलीतील भिडेगुरुजींचा हा व्हिडियो जोरात व्हायरल होतो आहे. संभाजी काहीही म्हणोत, तुम्ही काळजी. कारण ‘ये जिंदगी न मिले दोबारा.’