अनिल देशमुखांचा अखेर राजीनामा

Maharashtra News Politics

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. द्यावा लागला. देशमुख ७० वर्षे वयाचे आहेत. विदर्भातले आहेत. गेली ४० वर्षे राजकारणात आहेत.  ६ मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले. काळा डाग नव्हता. मात्र  ह्या वयात त्यांच्यावर ही नामुष्की यावी ही शोकांतिकाच म्हटले पाहिजे. नैतिकता म्हणून आपण राजीनामा देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. पण  मुंबई हायकोर्टाने  चौकशी लावली नसती तर राजीनामा दिला असता का?  कोर्टाने दणका  दिला म्हणून राजीनामा आला.  तसे पाहिले तर  मुकेश अंबानी यांच्या घरापुढे  स्फोटकांनी  भरलेली गाडी ठेवण्याच्या  प्रकरणात सचिन   वाझे याचे नाव आले तेव्हाच  देशमुखांनी मोकळे व्हायला हवे होते.  पण शरद पवारच नव्हे तर  शिवसेनेनेदेखील त्यांची पाठराखण केली. सरकार बदनाम झाले.

                  देशमुख यांच्यावरील  भ्रष्टाचाराच्या आरोपांची   सीबीआयकडून चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज तसे आदेश दिल्याने   राजकीय भूकंप आला.  देशमुखांच्या मागे दोनदोन चौकशा  लागल्या आहेत.  सीबीआयला १५ दिवसात  चौकशी पूर्ण करायला  न्यायालयाने सांगितले आहे. तिकडे  सरकारने स्वतःहून माजी न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल  यांची समिती याच कामासाठी  नेमली आहे.  चौकशीतून बचावल्यानंतर  देशमुखांना परत  मंत्रिमंडळात येता आले असते.  अजितदादा पवारांवर  सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले  तेव्हा त्यांनी हेच केले होते.  का कुणास ठाऊक  शरद पवार  देशमुखांचे प्रकरण प्रतिष्ठेचे करीत होते. हे प्रकरण वाढले तर  मोठमोठी  मंडळी अडचणीत येतील, असे काही आहे का?

                मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटरबॉम्बमध्ये  जे आरोप केले होते त्याच आरोपांची  सीबीआय चौकशी करणार आहे. ‘देशमुखांनी सचिन वाझे याला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते’ असे परमबीर यांनी पत्रात म्हटले होते.  पण  कोर्टाने परमबीर यांची याचिका   फेटाळली.  ह्याच मुद्यावर एकूण तीन याचिका आल्या होत्या.  त्यातली मुंबईच्या ज्येष्ठ वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर कोर्टाने हा चौकशीचा आदेश दिला आहे.  देशमुखांना  जाळ्यात अडकावणाऱ्या  जयश्री ह्या    स्वातंत्र्य सैनिकाच्या  कन्या आहेत. मानवाधिकारासाठी लढणाऱ्या वकील म्हणून  त्या प्रसिध्द आहेत.  जयश्री कशा लढतात, हे प्रकरण कुठे  थांबते  की  पूर्ण  सरकारला बुडवते याकडे देशाचे लक्ष  राहणार आहे.  सचिन वाझे हा साधा पोल्स इन्स्पेक्टर नाही. त्याच्या दोन्ही खिशात  बॉम्बच बॉम्ब आहेत. वाझे बोलला तर एकाच वेळी अनेकांना आउट व्हावे लागेल इतका हा भयंकर मामला आहे. मोठे राकेट आहे. महाआघाडी सरकारची ही दुसरी विकेट पडली आहे.  धनंजय मुंडे बचावले. पण  शिवसेनेचे वनमंत्री   संजय राठोड यांची दांडी उडाली.   ह्या दोन्ही विकेट घेणारे  देवेंद्र फडणवीस  यांच्या रडारवर  आता कोण येते ते पाहायचे.

0 Comments

No Comment.