छत्तीसगडने पुन्हा एक महाभयंकर माओवादी हल्ला पाहिला. विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल शनिवारी भर दिवसा पेटले. माओवाद्यांशी झालेल्या सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलाचे तब्बल २२ जवान मारले गेले. जोनागुंडाचा हा डोंगराळ भाग माओवाद्यांचा मोठा अड्डा आहे. कुख्यात हिड्मा मडावी इथे असल्याची माहिती मिळाल्यावरून मोठे ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. काहीतरी गडबड झाली. जवान घेरल्या गेले. देश हादरला. पण एक सांगू का? अशा हल्ल्यांची नव्हाळी केव्हाच संपली आहे. पूर्वी याहीपेक्षा भयंकर हल्ले झाले आहेत. ११ वर्षापूर्वी दंतेवाडामध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ७५ जवान ठार झाले होते. प्रत्येक हल्ल्यानंतर काही दिवस चर्चा होते. ‘बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही’ असे सरकार म्हणते. पुढे सारे शांत होते. लोकांना आता याची सवय झाली आहे.
शत्रूच्या हल्ल्यात शहीद होणे समजू शकते. पण इथे आपल्याच देशात आपलेच जवान मारले जात आहेत. गेली ५० वर्षे हे सुरु आहे. बंगालमध्ये नक्षलवादाचा उदय झाला. आज तब्बल २० राज्यांमध्ये तो पसरला आहे. शेतकऱ्यांची चळवळ म्हणून उठाव करणाऱ्या नक्षलवाद्यांनी आता भारताशीच युध्द पुकारले आहे. ते लढण्यासाठी लागणाऱ्या बंदुका, गोळ्या त्यांच्याकडे कुठून येतात? हा प्रश्नच आहे. प्रश्न हा आहे, की एवढे बलाढ्य सरकार त्यांना का ठेचत नाही? चारही बाजूने जंगल घेरा, पिंजून काढा. तुमच्याकडे सैन्य आहे, दारुगोळा, बंदुका आहे, आता राफेलही मदतीला आहे. वाट कशाची पाहता? आणखी किती शहिदांची आहुती हवी आहे? खलिस्तानी चळवळ इंदिरा गांधींनी एका दणक्यात संपवली. मोदी सरकारचे कोणी हात बांधलेत? कुठे गेली इच्छाशक्ती? ५६ इंचाची छाती? केवळ निवडणुका जिंकण्यासाठी लोकांनी मोदींना डोक्यावर घेतले नाही. लोकांना रिझल्ट्स हवे आहेत. मोदी बंगाल जिंकतीलही. पण जनता हरते आहे, जवानही मरताहेत त्याचे काय?