घरी दोन पेशंट, तरीही उद्धव ठाकरे कामात व्यस्त

Editorial News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करण्याची  संधी फार कमी येते.  सध्या करोनाच्या संकटात ते ज्या हिंमतीने राज्याचा  कारभार चालवत आहेत ती  नक्कीच कौतुकास्पद आहे.  आरोग्य यंत्रणा सक्षम करायची म्हटले तर पैसा पाहिजे.  सरकारच्या खजिन्यात तर खडखडाट आहे.  त्यामुळे ते विरोधकांच्या टीकेचे टार्गेटही होत आहेत.  तरीही कुठे त्यांचा तोल गेलेला दिसला नाही.  राज्यात दररोज  करोना रुग्णांच्या संख्येत भर  पडत आहे. खुद्द  उद्धव यांच्या घरी दोन पेशंट आहेत.   पत्नी रश्मीताई   रुग्णालयात दाखल  आहेत  तर मुलगा  पर्यावरण मंत्री आदित्य करोनाशी झगडतोय. होम क्वारंटाईन आहे.  दुसरा एखादा असता तर हातपाय गाळून बसला असता.  ६० वर्षे वयाचे उद्धव हे स्वतः हार्ट पेशंट आहेत.  त्यांच्या हार्टमध्ये  अनेक स्टेन्स टाकलेले आहेत.  त्या अवस्थेतही त्यांनी उचललेले   महाराष्ट्राचे शिवधनुष्य सोडलेले नाही. शेवटी आहे तर तो बाळासाहेबांचा मुलगा. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’  असा नारा उद्धव यांनी दिला होता.  पण उद्धव  स्वतःचेच घर सुरक्षित राखू शकले नाहीत अशी टीका भाजपने केली.   अशी टीका करू नये. प्रत्येक  जण  आपले घर  सुरक्षित ठेवताना  धडपडतो आहे.   कुठेतरी करोना डाव साधतो.

             राष्ट्रवादीचे  गृहनिर्माण  मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी   याबद्दल   एक भावनिक ट्वीट केले.  आव्हाड म्हणाले,   ‘घरी दोन पेशंट असताना आपण महाराष्ट्र सांभाळता आहात.  टीका करणं सोपे आहे.  पण उद्धव  होणं अवघड.’ आणि ते खरे आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत  उद्धव यांचा प्रभाव जाणवला नाही.  ते फारसे घराबाहेर निघाले नाहीत. पण आता ते ती कसर भरून काढताना दिसत आहेत.  करोनाशी कसे लढायचे?  बैठ्कावर बैठका सुरु आहेत. करोनाशी लढताना युरोपीय राष्ट्रांनी  अनेक वेळा  लॉकडाउन लावला  असा दाखला  उद्धव यांनी  दिला.  त्यावर भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला.   तिकडच्या राष्ट्रांनी जनतेला आर्थिक मदत केली.  तुम्ही काय मदत करणार?  असा सवाल भाजपने केला तेव्हा मोदी सरकारला आव्हाड यांनी चिमटा काढला.  पहिल्या लाटेत नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी  मोदींनी २० लाख कोटी रुपयाची मदत जाहीर केली होती. यातली किती महाराष्ट्राच्या वाट्याला आली?   आणि ते खरे आहे. खूप काही आपल्या हाती लागले नाही.  करोना हे राष्ट्रीय संकट आहे. मोदींनी  मन मोठे केले पाहिजे.

0 Comments

No Comment.