राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या अचानक उमललेल्या पोटदुखीने महाआघाडी सरकारवरचे संकट लांबले. बुधवारी त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया आहे. रुग्णालयातून बाहेर येऊन चालते फिरते व्हायला १५ दिवस आरामात लागतील. पवार हे या सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठला मोठा निर्णय करणार नाहीत. पवारांच्या आजारपणात भाजपही पूर्वीसारखा आक्रमक नसेल. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा विषयही आता मागे पडेल. एनआयएच्या चौकशा चालू राहतील. त्यांचे पुढे काय व्हायचे ते होईल. पण तूर्त सरकार बचावले आहे.
गेले दोन महिने घडामोडींनी भरलेले गेले. अंबानी यांच्या घराजवळ मिळालेली स्फोटकांनी भरलेली कार, पुढे त्या कारचा मालक मनसुख हिरेन याचा मिळालेला मृतदेह, त्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला झालेली अटक आणि वाझे रोज करीत असलेले खुलासे, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आरोप, रश्मी शुक्ला यांचे फोन चोरून ऐकल्याचे प्रकरण आणि मुख्यमंत्र्यांनी देशमुखांची लावलेली चौकशी…अशा एकाहून एक सनसनाटी घडामोडींमुळे सरकार अडचणीत आले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या आगीत तेल ओतले. त्यांनी अनिल देशमुखांना अपघाती गृहमंत्री म्हटले. एवढेच नव्हे तर ‘वाजेची वसुली देशमुखांना माहित नव्हती काय?’ असा बोचरा सवालही केला. त्यामुळे शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी असा नवाच संशयकल्लोळ उभा राहिला. संजय यांच्याविरोधात सहसा कोणी बोलत नव्हते. पण प्रथमच ‘आघाडीत मिठाचा खडा टाकू नका’ अशा शब्दात अजितदादा पवार यांनी राऊतांना वाजवले. आघाडीतल्या ह्या अंतर्गत संघर्षाला आता अल्पविराम मिळाला आहे.
शरद पवार आणि अमित शहा अहमदाबादमध्ये एकत्र काय भेटले, नवीनच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीला घेऊन भाजप सरकार बनवणार काय? अशी ही चर्चा आहे. पवार लगेच आजारी पडल्याने नेमके काय शिजले याचा खुलासा झाला नाही. पण असे काही शिजले असेल असे वाटत नाही. सध्या भाजपची चिंता वेगळी आहे. सरकार पडत नसल्याने भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. देवेंद्र फडणविसांनी लॉलीपॉप देऊन आतापर्यंत ह्या आमदारांना थोपवून ठेवले. पण आता अवघड होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या दोन्ही कॉन्ग्रेसमधल्या आमदारांचा संयम सुटू लागला आहे. ५० आमदारांचा एक मोठा गट स्वगृही परतू पाहतो आहे. बंगालचे निकाल येईपर्यन्त थांबा असे देवेंद्र यांनी त्यांना सांगितले आहे. ममता फेल झाल्या तर देशाचेच राजकारण बदलणार आहे. आपल्याकडे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठा भूकंप होईल. उद्धव सरकार पाडणे जमले नाही तर अमित शहा राष्ट्रपती राजवट आणतील.