‘कुणी बेड देता का बेड’

Editorial News

‘नटसम्राट’ नाटकात   श्रीराम    लागू  ‘कुणी घर देता का घर’   असा टाहो फोडतात  तेव्हा  काळीज फाटते.  करोना महामारीच्या   पार्श्वभूमीवर  राज्यात सध्या तेच चित्र आहे.  नागपूर आणि औरंगाबाद  येथे तर  आरोग्य  यंत्रणाच  व्हेंटीलेटरवर आहे.  ‘कुणी बेड देता का बेड’  म्हणत  करोनाबाधितांचे नातलग   रुग्णालये पालथी घालत आहेत. पण सरकारी  रुग्णालयात बेड मिळत नाही. खासगी  रुग्णालयात  जायचे झाले तर काही लाखाचा गंडा आहे.  त्यामुळे जायचे कुठे?  जंबो सेंटरची भाषा करणारे मंत्री गेले कुठे?  असा संतप्त सवाल लोक करतात.  नागपुरात  एकाच  बेडवर दोघा दोघा पेशंटना  झोपवले जात  आहे.     वाढत्या गर्दीने    करोना रुग्णांना  जमिनीवर झोपवण्याची पाळी औरन्गाबादेत आली आहे.  नागपूर जिल्ह्यात आज रेकॉर्डब्रेक झाला.   चार हजार  रुग्णांची भर पडली.    यात  नागपूर शहरातले  १८०० रुग्ण आहेत.

                 नागपुरात करोनाने मृत्यूचा  खेळ मांडला  असताना  मंत्र्यांचे दुर्लक्ष  सुरु आहे.  शहराची  काळजी घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच ‘नॉट रिचेबल’ आहेत.  पालकमंत्री नितीन राऊत   तामिळनाडूला  गेले आहेत. तिथल्या निवडणुकीत कॉन्ग्रेसचा प्रचार  करीत आहेत.  अनिल देशमुख, सुनील केदार हे मंत्री आणि विरोधी नेते देवेंद्र फडणवीस हेही  बाहेर आहेत. त्यामुळे नागपूरची जनता वाऱ्यावर आहे.  वर्षभरापूर्वी  करोनाचे संकट  भयंकर होते. तेच चित्र नागपुरात   आताही  आहे.  प्रशासन कमी पडत आहे.   सरकारी रुग्णालयात खाटा  कमी पडत आहेत.  खासगी रुग्णालयात गेले तर तिथे मोठी रक्कम आधी जमा करायला सांगितले जाते.        ती रक्कम  काही लाखाच्या घरात जाते.  त्यामुळे गरिबांनी उपचार घ्यावा तरी कुठे असा प्रश्न  आहे. 

              करोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरें  येत्या मंगळवारी जनतेशी बोलणार आहेत.    ते लॉकडाउन देतात की  आणखी कडक निर्बंध  लादतात याकडे  राज्याचे लक्ष लागले आहे.     गर्दी कमी झाली नाही तर   लॉकडाउनच्या धमक्या सरकार देत आहे.   अजितदादांनी आज पुणेकरांना   आठ दिवसाचा  अखेरचा इशारा दिला.    रस्त्यावरची गर्दी ,   नव्या रुग्णांची  वाढती संख्या, दोन्ही गोष्टी कमी होत नसल्याने प्रशासनही हतबल झाल्यासारखे दिसत आहे. 

0 Comments

No Comment.