का टोचत नाही लशी?

Editorial News

महाराष्ट्र सरकार व्यवस्थित चालले आहे. सारे आलबेल आहे  असे  राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार म्हणत असले तरी   मोदी सरकारला ते  मान्य नाही.  करोनाची दुसरी लाट रोखण्यात  महाराष्ट्राचे प्रशासन गंभीर नाही असा ठपका     ठेवत  केंद्रीय आरोग्य सचिवाने प्रशासनाला  ठोकून काढले. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना  आरोग्य सचिवाने   तसे पत्रच लिहिले.  रुग्णांचा तपास लावण्यापासून तो   चाचण्या  वाढवणे,  सुरक्षित वावर राखणे, लसीकरण ह्या सगळ्याच पातळीवर    सरकारचे दुर्लक्ष  होत आहे.  उद्धव सरकार हे कबूल  करणार नाही. पण  आकडे खोटे बोलत नसतात.   लसीकरणाची  गती तर  अतिशय धीमी आहे.  याच वेगाने आपण टोचत गेलो तर सारा देश टोचायला किमान दोन वर्षे लागतील.   केंद्राने सुरुवातीला  ५४ लाख लशींचे डोस   महाराष्ट्रात पाठवले होते.     आणखी १२ लाख डोस पाठवत आहेत.  पण यातल्या २३ लाख लशीच वापरल्या गेल्या.  ५६ टक्के लशी पडून आहेत.  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी  राज्य सरकारवर बेजबाबदारपणाचा  आरोप केला आहे.

                           पण उद्धव सरकार ते मानायला तयार नाही.  राजकारण जोरात पेटले आहे. राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील म्हणाले,   महाराष्ट्रात  सर्वाधिक संकट असताना  मोदी सरकारला  पाकिस्तानला लशी पुरवण्याची चिंता आहे.  हे म्हणतात, पुरेशा लशी नाहीत. ते म्हणतात, खूप पाठवल्या. नुसता फुटबॉल सुरु आहे. काय भानगड आहे?  लोक लशी घ्यायला का पुढे येत नाहीत?  सरकार स्वतःकडे  लशी का घेऊन बसले आहे? मागेल त्याला लस आणि तीही फुकट दिली असती तर चांगला प्रतिसाद मिळाला असता. सार्वजनिक आरोग्य ही सरकारची पहिली जबाबदारी असताना  सरकार २५० रुपये का घेत आहे?  सामाजिक संस्थांनाही ह्या कामात सहभागी करून घ्यायला  हवे होते.   ह्या लशीबद्दल लोकांमध्ये अजूनही भीती आहे. ती  घालवण्यात प्रशासन कमी पडते आहे.

                 लॉकडाउन हे उत्तर नव्हे हे कळत असतानाही सरकार   बंदच्या मागे लागले आहे.  अलीकडे  चाचण्या वाढल्या म्हणून पेशंट वाढले आहेत. चाचण्या आणखी वाढल्या पाहिजेत.  प्रत्येक पेशंटच्या   संपर्कात आलेल्या २०-३० लोकांना  शोधून काढले पाहिजे.  मेहनतीचे काम आहे. पण ते झाल्याशिवाय करोना आटोक्यात येणार नाही.  आज देशातील एकूण करोना रुग्णांपैकी   ५६ टक्के  रुग्ण   एकट्या महाराष्ट्रात आहेत.  नागपुरात गेल्या चार दिवसांपासून  रोज दोन हजारावर नवे पेशंट  सापडताहेत.  मंगळवारी १३ हजार चाचण्या करण्यात आल्या.  ३० लाख लोकसंख्येच्या नागपुरात  एवढ्या चाचण्यांनी काय साध्य होणार? प्रयत्न अपुरे पडत आहेत हे  प्रशासनाने मान्य केलेच पाहिजे.

0 Comments

No Comment.