अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी नागपूर गाठले. सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यांच्यात तब्बल अर्धा तास दार बंद करून चर्चा झाली. या भेटीत काय शिजले ते कळायला मार्ग नाही. पण शिजवायला भाजपच्या हाती आता डाळ-तांदूळ आहेच कुठे? ‘ऑपरेशन लोटस’ वगैरे फोकनाड आहे. राम मंदिराच्या वर्गणीची चर्चा झाली असेल. पण राज्यात सत्ता परिवर्तनाच्या चर्चेला उधाण आले आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार तर मुहूर्त सांगत सुटले आहेत. ‘बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे. चार महिन्यात भाजपची सत्ता परत येईल’ असा त्यांचा दावा आहे. देवेंद्र यांनी तर ‘मी पुन्हा येणार’ हे आधीच सांगून ठेवले आहे. पण तुम्ही लिहून ठेवा. काहीही होणार नाही. विधानसभा अध्यक्षाची निवडणूक केली नाही, वैधानिक विकास मंडळे गुंडाळली अशी कारणे सांगत भाजप नेते राष्ट्रपती राजवटीचे केस बनवत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना हाताशी धरून सरकारचा मोठा गेम करायचा भाजपचा गेम आहे. हे खरे आहे की, अमित शहा यांना काहीही करून महाराष्ट्रात भाजपची सत्ता हवी आहे. पण नरेंद्र मोदी घाई करायला तयार नाहीत. त्यामुळे भाजप नेत्यांची अस्वस्थता वाढत आहे.
तीन पक्षांच्या महाआघाडी सरकारकडे भक्कम बहुमत आहे. सरकार ते कसेही रडत खडत चालवत असतील, तो वेगळा मुद्दा झाला. त्यांच्यात भांडणेही आहेत. पण सोनिया गांधी नाही म्हणत नाहीत तोपर्यंत सरकारला धोका नाही. शरद पवारही काही गडबड करण्याची शक्यता नाही. शिवसेनेने त्यांचा ‘देव’ केला आहे. ते तेवढ्यावर खुश आहेत. शिवसेनेला मुंबई हातात असण्याशी मतलब आहे. शिवाय, हिंदुत्व वगैरे मुद्दा नसल्याने शिवसेनेची मौज आहे. देवेंद्र अजूनही आपली १०५ डोकी मोजत आहेत. पण खरा धोका भाजपला आहे. पाच वर्षात सत्तेच्या सुखाला चटावलेले नेते भाजप सोडण्याच्या मूडमध्ये आहेत. पाच राज्यांचे निकाल कसे लागतात त्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. बंगालमध्ये मोदी हरले तर पोळा फुटलाच समजा.