कोलकात्याच्या ब्रिगेड मैदानावर काही लाखांची सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तिकडे सिलीगुडीमध्ये महिलांची रिकाम्या सिलेंडरसह पदयात्रा काढून मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉन्ग्रेसच्या सुप्रीमो ममता बनेर्जी यांनीही शंखनाद केला. पहिल्या टप्प्याच्या मतदानाला अजून २० दिवस असले तरी युद्ध पेटले आहे. दोघांसाठीही ही आरपारची लढाई आहे. दीदीने ही निवडणूक जिंकली तर ती हाट्रिक होईल. मोदींना हरवले जाऊ शकते हा विश्वास २०२४ मध्ये विरोधी पक्षांना कामाला येईल. दीदीला ही निवडणूक सोपी नाही आणि मोदींनाही वॉकओव्हर नाही. पाच वर्षापूर्वी इथे भाजप औषधालाही नव्हता. मग काय होईल बंगालमध्ये?
कुठल्याही राज्यातली निवडणूक जिंकायची असेल तर तिथले रेडीमेड नेते फोडायचे हा भाजपचा जुना फॉर्म्युला राहिला आहे. बंगालमध्येही त्यांनी खूप फोडफाड केली आहे. सुधेंदू अधिकारी ह्या आपल्या एकेकाळच्या विश्वासू नेत्याशीच दोन हात करताना दीदी दिसतील. या शिवाय, ‘आमोल परिवर्तन’, सोनार बांगला, जय श्रीराम असले नेहमीचे जुमले सोबतीला आहेतच. आणि हो, एमआयएमचे ओवैसी आहेतच. करोनाकाळाचा फायदा घेऊन मोदींनी दाढी वाढवली आहे. त्यांना रवींद्रनाथ टागोर म्हणून दाखवण्याची भाजपची धडपड आहे. पण एक सांगू का? ७० वर्षे वयाच्या मोदींनी बंगालची निवडणूक अंगावर घेऊन आयुष्यातला मोठा जुगार खेळला आहे. ६६ वर्षे वयाच्या तापट स्वभावाच्या दीदी ह्या रस्त्यावर खेळणाऱ्या नेत्या आहेत. त्यांना ललकारू शकेल असा एकही नेता कॉन्ग्रेस, डावी आघाडी किंवा भाजपकडे नाही. माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली आले असते तर अवघड गेले असते. गांगुली चलाख निघाले. भाजपच्या गळाला लागले नाहीत. मिथुन चक्रवर्ती आला आहे. पण त्याचे तेवढे आकर्षण नाही. प्रभावी ‘लोकल’ चेहरा नसल्याने मोदींनाच रणांगणावर लढावे लागणार आहे.