हा महिना दोन गोष्टींनी गाजतोय. पहिली म्हणजे कोरोना. दुसरी गोष्ट म्हणजे वनमंत्री संजय राठोड. करोनाच्या केसेस सारख्या वाढत आहेत. आता तर तो शाळांमध्येही पसरू लागला आहे. लोकांनी काय करावे हे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोकळे झाले. पण सरकार काय करतय ते कळायला मार्ग नाही. चेहऱ्याला मास्क नाही म्हणून दंड वसुलीचा सपाटा सुरु आहे. पण एवढे केले म्हणजे करोना मरणार का? आरोग्य विभागच आजारी आहे. करोनाला मारायला पुरेसे सैन्य कुठे आहे? लोकांनी आपापली काळजी घ्यावी हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले तेच खरे. वाचलात तर पुढच्या निवडणुकीत मतदानाला या. नाहीतर रामनाम सत है.
पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या आत्महत्येमुळे वादात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागताला पोहरादेवी गडावर गर्दी होणार नाही याची काळजी सरकारने घेतली नाही. म्हणून तेथे हजारो लोकांनी गर्दी केली. गर्दीमुळे करोना पसरू शकतो ही भीती असतानाही पोलीस गाफील राहिले. आज ती भीती खरी ठरली. पोहरादेवीचे महंत कबीरदास महाराज यांच्यासह गावच्या १९ जणांना करोना झाल्याचे उघड झाले. ह्या महाराजांना दोन दिवसापासून करोनाची लक्षणे होती. टेस्टही झाली होती. तरीही ते राठोड यांच्यासोबत सावलीसारखे मिरवत होते. उद्या राठोडही पॉजिटिव्ह निघू शकतात. काल ते मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे वाचून पोटात गोळा उठला. राठोड यांनी ताबडतोब टेस्ट करून घ्यायला पाहिजे.
पुजाची आत्महत्या १८ दिवसापासून गाजते आहे. आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पूजाच्या चर्चेत नवा जोश भरला. पुण्यातील ज्या वानवडी पोलीस ठाण्यात ह्या आत्महत्येचे प्रकरण आहे तेथे जाऊन तिथल्या पोलीस अधिकाऱ्यापुढे त्यांनी हंगामा केला. राठोड यांच्याविरुध्द गुन्हा का नोंदला नाही हा त्यांचा सवाल होता. ‘आपल्याला आदेश नाहीत’ असे तिथला अधिकारी म्हणाला. पोलीस महासंचालक नगराळे आज नागपुरात होते. नगराळे यांनी नेमका विषय सांगितला. ‘आत्महत्या हा गुन्हा मानून तपास चालू आहे’ असे नगराळे म्हणाले. याचा अर्थ पोलिसांच्या तपासात संजय राठोड रडारवर नाहीत. भाजप क्लिप्स वगैरे नाचवत आहे. वाहिन्यांवर गरमागरमी सुरु आहे. जे सुरु आहे ती मिडिया ट्रायल आहे. ती पाहून महाआघाडीचे नेते गंमत घेत असणार.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक मार्चपासून सुरु होत आहे. ते फक्त १० मार्चपर्यंत चालणार हे आज स्पष्ट झाले. १० दिवसात काय चर्चा होणार? करोना आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चेला किती वेळ मिळणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांचा संताप समजू शकतो. ‘अधिवेशन आले की सरकारला करोना दिसतो. मग संजय राठोड शक्तीप्रदर्शन करीत होते तेव्हा तुम्ही कुठे होता?’ असा रोखठोक सवाल त्यांनी केला. अधिवेशन वादळी होणार हे नक्की.