नरेंद्र मोदींचा मोबाईल नंबर हवाय?

Editorial

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकांना आवडत नाहीत. पण त्यांच्याबद्दल बरेवाईट बोलल्याशिवाय  त्यांना   राहवतही नाही. मोदी नाही तर दुसरे कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर मोदीच येते.  मोदींशी भांडायला, त्यांचे कौतुक करताना  जी  झिंग येते ती  इतर कोणत्या नेत्याबाबत येत नाही.  त्यामुळेच पाच वर्षे हालअपेष्टा  भोगूनही  लोकांनी पुन्हा मोदींच्या हाती सत्ता दिली.  मोदीभोवती सुरक्षेचे  कडे पाहता त्यांच्यापर्यंत पोचणे अवघड आहे.  निदान मोबाईलवर बोलता आले तर?  पण त्यांचा नंबर काय? मोदी है तो सब मुमकिन है. पण त्यांचा मोबाईल नंबर?

                   मोदींचा मोबाईल नंबर फार कमी लोकांना  माहित असेल. ते मोबाईल जवळ ठेवतात की नाही याचेही कुतूहल आहे. कारण  मोबाईलवर त्यांना बोलताना कुणी पाहिलेले नाही.  त्यामुळे  हा  नंबर मिळवण्यासाठी  सामान्य माणसांची धडपड सुरु असते.   अलीकडे लोकसभा टीव्ही  वाहिनीवर हेल्पलाईनचा एक नंबर सारखा दाखवला जात आहे.  खासदारांच्या मदतीसाठी  केंद्र शासनाच्या वतीने  २४ तास चालणारी  हेल्पलाईन सेवा  सुरु करण्यात आली आहे.  ह्या हेल्पलाईनवर  मोदींना भेटण्यासाठी त्यांचा नंबर मागणाऱ्याचे  सारखे फोन येत आहेत. ‘मोदींशी बोलायचे आहे. त्यांचा नंबर देता का?’  अशी विचारणा सुरु असते. त्यामुळे हेल्पलाईनवालेही हैराण झाले असणार. मोदी मोबाईलवर उपलब्ध झाले तर त्यांना दुसरे कामच करता येणार नाही. २४ तास  बोलत बसावे लागेल.   कुण्याही पंतप्रधानाला हे परवडणारे नाही.   त्यामुळे मोदींची ‘मन की बात’ ऐकून जनतेला  दुधाची तहान ताकावर भागवणे  भाग आहे.

           ‘आताच मी मोदींशी मोबाईलवर बोललो’ असे सांगणारा भाग्यवान सामान्य माणूस अजून  सापडायचा आहे. मोबाईलने संपर्क सोपा झाला. पण अनेक नेते मोबाईलवर बोलायचे टाळतात. अनेकांचा मोबाईल नेहमी सायलेंट  मोडवर असतो.  अनेक जण  तर मोबाईल आपल्या पीएकडे ठेवतात.  साहेबाला कोणाशी बोलायचे असते, ते पीएला ठाऊक असते.  ‘सेव्ह’ नसलेला नंबर  घ्यायचा नाही अशी अनेकांची पद्धत आहे. पण काही नेते कुठलाही फोन सोडत नाहीत.  विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाही कुठलाही फोन  सोडत नव्हते.  सामान्य माणूसही  त्यांना मोबाईल करायचा आणि विलासराव  तो घ्यायचे.  समोरच्याचे समाधान होईपर्यंत बोलायचे. बैठकीत असतील तर नंतर   सवडीने स्वतःहून कॉल करायचे. आता हे मोबाईलदाक्षिण्य फारसे कुणी पाळताना दिसत नाही. त्यातून कुणी फोन उचललाच तर ‘मोबाईल पे बात’ करणारे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच.

0 Comments

No Comment.