काही वर्षापूर्वी एक व्यंगचित्र सोशल मिडीयावर फिरत होते. त्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे झोपले असून ‘भाजपचे राज्य गेल्यावर मला उठवा’ असा फलक शेजारी ठेवला होता. आज देशात भाजपचे राज्य असले तरी महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता आहे. मग अण्णा झोपेतून उठले असे आता समजायचे का? कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ३० जानेवारीपासून करायचे उपोषण त्यांनी बसण्याआधीच मागे घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेले, देशाला फारसे माहित नसलेले केंद्रीय राज्यमंत्री कैलाश चौधरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनावर भुलून अण्णांनी आपले उपोषणास्त्र म्यान केले. अण्णापुरता हा विषय संपला. पण त्यावरून राजकारण सुरु झाले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना दैनिकाने अग्रलेख लिहून अण्णा कुणाचे? हा नेमका सवाल केल्याने राजकारण तापले आहे. दिल्लीत आंदोलन करीत बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णांची भूमिका काय? असा चिमटा शिवसेनेने काढला. अण्णा सहसा चिडत नाहीत. पण यावेळी ते पार सरकले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या भानगडींना तुम्ही कसे पाठीशी घातले त्याचे सारे डिटेल्स देतो असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ब्लड प्रेशर वाढवले आहे.
म्हणजे शेतकरी आंदोलनाचा मुख्य मुद्दा बाजूला पडला. अण्णांनी आतापर्यंत तब्बल दोन डझनपेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. त्यांचे प्रत्येक आंदोलन राजकारणात केव्हा गुंडाळले गेले ते अण्णांनाही कळले नसेल. अण्णांची आंदोलने सामाजिक प्रश्नांवर होती. पुढे ती भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत परिवर्तीत झाली. राजकीय मंडळीने त्याचा फायदा उठवला याचे भान अण्णांना अजूनही आलेले दिसत नाही. भ्रष्टाचार संपवण्यासाठी लोकपाल हवा ही मागणी घेऊन अण्णांनी पूर्ण देश हलवून सोडला होता. मनमोहनसिंह म्हणजे कॉन्ग्रेस सरकारच्या विरोधातली ही लढाई असल्याने भाजप आणि संघ परिवाराने अण्णांना खुबीने वापरून घेतले. जयप्रकाश नारायणानंतर ‘दुसरा गांधी’ अशी अण्णांची तेव्हा हवा होती. अण्णांनी निर्माण केलेल्या हवेमुळे मोदी सत्तेत आले. पण त्यांनी काय दिले? लोकपाल कायदा आला. पण त्या लोकपालाला दात नाहीत, हातपाय नाहीत. त्यामुळे लोकपाल येऊनही भ्रष्टाचार संपणे तर सोडा, वाढला आहे. ज्या आंदोलनामुळे कॉन्ग्रेस घरी बसला तो लोकपाल कोणाच्याही गावी नाही. एक टक्का खासदारांनाही विद्यमान लोकपालाचे नाव सांगता येणार नाही. एकेकाळच्या आंदोलनात अण्णासोबत होते ते अरविंद केजरीवाल, किरण बेदी, रामदेवबाबा आज कुठे आहेत आणि काय चिज आहेत ते देशाला कळले आहे. अण्णांच्या आंदोलनात जायचे आणि त्या भांडवलाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचा असाच इतिहास आहे. त्यामुळे वयाचा विचार न करता, आज वयाच्या ८३ व्या वर्षीही अण्णांना मोदींशी लढवले जाते. एकेकाळी अण्णांचे साधे पत्रही सरकारला धडकी भरवायचे. आज कुणी मोजत नाही. मोदी मोजत नाहीत. अण्णांच्या आंदोलनाचे काय हाल होतात ते सध्या देश पाहतो आहे. अण्णांच्या विश्वासार्हतेवर आज सारे प्रश्नचिन्ह लावतात. पण आज कुणाची विश्वासार्हता शिल्लक आहे? अण्णांचीही नाही. त्यामुळे सध्या देश ढवळून काढणाऱ्या शेतीच्या तीन वादग्रस्त कायद्यांबाबत अण्णा अजिबात बोलणार नाहीत.
मुद्द्दा वादग्रस्त कायदे रद्द करण्याचा आहे. पण इथे नवीनच एक उच्चाधिकार समिती बनवत आहेत. त्या समितीचा आणि वादग्रस्त कायद्यांचा काय संबंध? कायदे संसदेने मागेच पास केले आहेत. आणि मोदी ते मागे घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे अण्णांची ही नवी समिती शेतकऱ्यांना त्यापेक्षा वेगळे काय देणार आहे? काहीही देऊ शकत नाहीत. तरीही अण्णांनी आयुष्यात प्रथमच ‘वाघा’ला छेडले आहे. कोण कुणाला खातो ते पहायचे.