अजूनही का मरत नाही करोना?

Analysis Lifestyle

करोना आटोक्यात आला आहे. त्याची भीतीही आता कुणाला वाटत नाही. दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यापासून बसलेल्या लाखो शेतकऱ्यांनी करोनाची भीती संपवली आहे. दिल्लीत करोना आहे. पण त्याच्या सीमेवर लाखो शेतकरी दोनदोन महिने एकत्र जमतात तिथे करोनाचा एकही पेशंट निघू नये हे आश्चर्यच आहे. करोनाकाळात लाखो भिकारी तोंडाला मास्क न लावता उघड्यावर होते. त्यातल्या कुण्या भिकाऱ्याला करोना झाल्याची केस नाही. करोनाबरोना म्हणजे झूट आहे असे मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कार्पोरेटवाल्यांनी मिडीयाला पकडून उठवलेले हे षड्यंत्र आहे, असे ह्या लोकांना वाटते. काहीही असले तरी कोरोनाने देशातील एक कोटी लोकांना तडाखा दिला हे वास्तव नाकारता येत नाही.

                     आपल्याकडे गेल्या वर्षी २५ मार्चपासून  कोरोनाने धुमाकूळ घालणे सुरु केले. महाराष्ट्राचा विचार केला तर  राज्यात मृत्यूदर अडीच टक्के आहे.   आजतागायत  राज्यात करोनाने ५० हजार लोकांचा मृत्यू झाला आणि दोन लाख लोक विलगीकरणात आहेत.  आतापर्यंत  देशात   दीड लाखाहून अधिक  लोकांच्या मृत्यूची नोंद  झाली. भारताची लोकसंख्या १३५ कोटी आहे हे लक्षात घेतले तर करोनाने  मरणाऱ्यांचे प्रमाण एक टक्काही नाही. पण ह्या एक टक्क्यासाठी  सारा देश नऊ महिन्यापासून सरकारने ‘लॉक’ करून ठेवला होता.  करोनाशी लढण्यासाठी आता मदतीला दोनदोन लस आल्या आहेत.  त्यामुळे  लोकांना लढण्याची  नवी उमेद मिळाली आहे.  येत्या एक तारखेला  मोदी सरकारचा अर्थसंकल्प येतो आहे. त्यातही  सरकार  मदतीच्या काही सवलती देईल.  त्यातून आपली अर्थव्यवस्था धावू लागेल असा विश्वास बाळगायला काय हरकत आहे?  पण लशी आल्या म्हणजे   भटकायला मोकळे ह्या  धुंदीत  कुणी असू नये.   मास्क, सुरक्षित अंतर   ठेवावेच लागेल. कारण   ही लस लगेच मिळणार नाही.   आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या लस  टोचली जात आहे.  त्या नंतर वयाची पन्नाशी उलटलेल्या लोकांचा नंबर लागेल.  अशा लोकांची संख्या २७ कोटी आहे.  हे आटोपल्यावर उरतात १०० कोटी  लोक.  त्यांचा नंबर यायला किमान एक वर्ष  लागेल.  लसीकरणाचा सध्याचा वेग पाहता दोन वर्षेही लागू शकतात.  ह्या लशीबद्दलही  काही लोक शंका  घेत आहेत. अनेकांनी ती  टोचून घ्यायला नकार दिला आहे.  पण सरकार देत आहे तर आपण  विश्वास ठेवायला हवा.  दुसरे काय औषध आहे आपल्याकडे?  भागते भूत की लंगोटी सही. 

           लस आली तरी काळजी घ्यायची आहे असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी बजावले आहे.  पण जनता ऐकायला तयार नाही.  नागपूरसारख्या शहरात गेल्या १५ दिवसापासून दररोज   तीनशे ते चारशे  करोनाबाधितांची  भर पडत आहे.   तेवढेच लोक बरे होत आहेत. पण नवे पेशंट येणे थांबलेले नाही. रस्त्यांवर, बाजारात  तोबा गर्दी आहे.  लग्नासाठी  शासनाने मर्यादा घालून  दिली असताना   धुमधडाक्यात  लग्न लागत आहेत. पूर्वी वस्तीत एकही पेशंट निघाला तर  तो भाग चिडीचूप व्हायचा.  आज दिसते आहे ती  बेशिस्त.  ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विजयी मिरवणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी घडवलेले शक्तीप्रदर्शन   अंगाचा थरकाप उडवणारे  आहे.  म्हणून म्हणतो, आगीशी खेळू नका. घरीदारी   काळजीने वागा. कारण विषाणूरुपी शत्रू एक नाही. अनेक आहेत. काही आले, काही येत आहेत.  देशातील १० राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.  एक लक्षात घ्या.  यापुढे आपल्याला करोना आणि त्यासारख्या विषाणूसोबतच जगायचे आहे. 
0 Comments

No Comment.