हमाम मे सब नंगे, मुंडे बचावले

Editorial Politics

अटलबिहारी वाजपेयी यांना पत्रकारांनी एकदा  प्रश्न विचारला होता. आपले लग्न झालेले नाही?   वाजपेयी त्यावर  मिस्कीलपणे म्हणाले होते, ‘माझे लग्न झालेले नाही. पण मी बालब्रम्हचारीही  नाही.’ शब्दात न सापडणाऱ्या  वाजपेयींना  कायदा आणि समाजही पकडू शकला नाही.    राष्ट्रवादी  कॉन्ग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री ४५ वर्षे वयाचे धनंजय मुंडे यांच्या  न झालेल्या  तिसऱ्या लग्नाच्या वादळात वाजपेयींचा हा किस्सा सध्या गाजतोय. मुंडे पूर्वी भाजपात होते. आठ वर्षापूर्वी ते  राष्ट्रवादीत आले.  भाजपमध्ये असताना त्यांनी केलेल्या कथित  भानगडी  आता राष्ट्रवादीला निस्तराव्या लागत आहेत. एका  महिलेने  केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे  अडचणीत आलेले मुंडे  बचावले आहेत.  दुसऱ्या लग्नाची कबुली देऊनही  त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय शरद पवारांनी म्हणजे राष्ट्रवादीच्या  कोअर कमेटीने घेतला आहे.  त्यामुळे  राज्याच्या राजकारणात  आलेले  वादळ अकाली थंडावले.  राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी  मुंडे यांच्यावरील  आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत असे गुरुवारी म्हटले होते. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्याचे मानले जात होते.  विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी सुरु केली होती.  सायंकाळपर्यंत   विरोधी पक्षातील दोन नेतेच मुंडेंच्या मदतीला धावले तेव्हा  शरद पवारांनीही सुटकेचा श्वास सोडला असेल. आपल्यालाही  ह्या महिलेने अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे भाजपचे नेते कृष्ण हेगडे आणि मनसेचे नेते मनीष  धुरी   यांनी   सांगितल्याने मुंडे यांची बाजू भक्कम झाली. पोलीस चौकशीत  काय  समोर येते त्याची वाट पाहू  असे सांगून राष्ट्रवादीने  मुंडेंना  जीवदान दिले.

               तुम्ही लिहून ठेवा. पुढेही काही होणार नाही. गृह खाते राष्ट्रवादीकडे आहे. पोलीस त्यांचे आहेत. काय होणार?  कुण्या महिलेच्या आरोपावर मंत्र्याचे  राजीनामे घ्यायचे म्हटले तर  अर्धे मंत्रिमंडळ रिकामे होण्याची भीती आहे.  ‘हनी-मनी’ सर्वच पक्षात आहे. हमाम मे  सब नंगे.  काचेच्या घरात राहणाऱ्यांनी  दुसऱ्यांच्या घरावर गोटमार करू नये  असे म्हणतात.  विरोधी नेते ह्या धर्माला जागले. तुम्ही पाहा.  मुंडेंचा मामला दोन दिवस गाजत असतानाही   भाजपने  तो म्हणावा तसा उचलला  नाही. किरीट सोमय्या  बोलले. पण त्यांना कुणी गंभीरपणे घेत नाही.  उद्या आपल्यातला कुणी ‘मुंडे’  अडचणीत येऊ शकतो असा  व्यावहारिक विचार  विरोधकांनी केला असावा. 

त्यामुळे एवढे कपडे उतरूनही  राष्ट्रवादीची लाज शाबूत राहिली. पण हा विषय पवारांनी एकट्या राष्ट्रवादीपुरता  मर्यादित का ठेवला? राजकीय पक्ष परस्पर निर्णय करायला लागले तर कठीण   होईल.  उद्या  अशोक चव्हाण यांची भानगड आली तर   बाळासाहेब थोरात निर्णय करणार आहेत का?  मुंडे राष्ट्रवादीचे असले तरी त्यांच्यावरील आरोपाचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात  निकाल व्हायला हवा होता. पवारांनी बारीकमध्ये  मामला परस्पर   सलटवला. पण हे कसे खपवून घेतले जाऊ शकते?  तीन पक्षांचे सरकार आहे म्हणून प्रत्येक पक्ष आपापल्या    नेत्याचे निवाडे करू लागला तर  मुख्यमंत्री  उद्धव यांचा रिमोट संपला असे मानायचे.  ‘मुख्यमंत्र्याचे नंतर बघू’ ही पवारांची भाषा  शिवसेनेला  आव्हान आहे.  उद्धव  हा विषय कसा घेतात याकडे  महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे. गंभीर आरोप झालेल्या मंत्र्याला उद्धव त्यांच्या सरकारमध्ये खपवून घेणार आहेत का? ती  महिला बदमाश असेलही.  पण मुंडे कोण? मुंडे यांनी लग्नाची बायको असताना दुसरीला  ठेवले, तिच्यापासून  दोन मुले काढली, त्याचे काय? अजून कुणी तक्रार केलेली नाही. पण म्हणून हे कुठल्या कायद्यात बसते?

                        मुंडेंचा निर्णय महाआघाडीच्या बैठकीत व्हायला हवा होता. पण मुंडेंना परस्पर अभय देण्यामागे राष्ट्रवादीची मजबुरी आहे.  अजितदादा सोडले तर  राष्ट्रवादीकडे   दमदार नेता नाही. वय झालेल्या नेत्यांच्या जोरावर पार्टी कशी वाढणार?  उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी  ८० वर्षे वयाच्या शरद  पवारांनी भर पावसात  स्वतःला भिजवून घेतले नाही.  त्यांना सुप्रियाला मुख्यमंत्री झालेले पहायचे आहे. पण राष्ट्रवादी ५०-५५ आमदारांच्या पुढे सरकत नाही.  त्यात  काही पुढारी  बायांच्या भानगडी करून ठेवतात. सारे खरकटे पवारांना निस्तरावे लागते.                    सामान्य माणसाला एक  मोठे कोडे आहे.     

मंत्र्याला भेटायचे म्हटले तर  सामान्य माणसाला सहजासहजी वेळ मिळत नाही.  ह्या बायांसाठी मंत्री कसा वेळ काढतात?  ह्या बाया  मंत्र्यापर्यंत पोचतात कशा? कोण पोचवते? पैसे उकळण्यापर्यंत ह्या बायांची मजल कशी जाते?  तपास करतो म्हटले तर  राजकारण्यांच्या  अधिकृत आणि अनधिकृत  बायकांची यादी   हनुमानाच्या शेपटीसारखी   लांबत जाईल. राष्ट्रवादीचे मंत्रीच जास्त रोमांटिक आहेत अशातला भाग नाही.  कॉन्ग्रेसमध्येही  शोधता येतील.   

आता  गोष्ट निघाली तर मुंडेंच्या विरोधातील  आरोपावर पोलिसांना तपास करावा लागणार. कारण स्त्रीवरील अत्याचाराची  केस आहे. एकीने अडकवण्याचा प्रयत्न केला ते समजू शकते. पण  दुसरीशी विवाहबाह्य संबंध ठेवले त्याचे काय?  मुंडे यांनी स्वतःच तशी कबुली दिली आहे. मग त्या कबुलीचे काय?  पूर्वी  लोक दोन-तीन  बायका करायचे.  मर्दुमकीचे ते लक्षण मानले जायचे. आजही काही घरी मोठी आई-छोटी आई  असे आवाज ऐकू येतात. पण आता  एका लग्नाचा कायदा केला तर तो केवळ सामान्य माणसालाच लागू  आहे असे  मानायचे का?

0 Comments

No Comment.