पंकजा मुंडे यांचा प्रॉब्लेम काय?

Analysis Maharashtra

पंकजा मुंडे ह्या धूर्त नेत्या आहेत. गोपीनाथगडावर समर्थकांच्या मेळाव्यात श्रेष्ठींना निशाणा करून त्यांनी बंड पुकारले आहे. पंकजा यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जोडीने जोरदार बॅटिंग केली. भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. आपण पक्ष सोडणार नाही असे पंकजा म्हणाल्या. पण त्यांनी कोअर कमिटी सोडली आहे. मुंडे प्रतिष्ठानचे काम सुरू केले आहे. गडावरील मेळाव्यात भाजपची कुठलीही निशाणी नव्हती.

त्या अर्थाने त्या पक्षात उरल्यात कुठे? खडसेही मनाने केव्हाच भाजपबाहेर पडले आहेत. पंकजा आणि खडसे हे ओबीसी नेते आहेत आणि ओबीसी ही भाजपची व्होट बँक आहे. त्यामुळे अमित शहा इतक्या लवकर स्वतःहून ह्या दोघांना हाकलणार नाहीत. पण ह्या दोघांनी पक्षनेत्यांच्या बदनामीची मोहीम अशीच चालवली तर भाजपपुढे दुसरा मार्ग नाही. भाजप नेते सध्या ह्या दोघांच्या बंडाची प्रतिक्रिया तपासून पाहत आहेत.

पंकजा यांच्या बंडात किती दम आहे? त्यांचा खरा प्रॉब्लेम काय? पक्षाने तिकीट दिले. त्या निवडून आल्या नाहीत यात पक्षाचा काय गुन्हा? देवेंद्र फडणवीस हा त्यांचा खरा प्रॉब्लेम आहे. देवेंद्र हे ब्राम्हण आहेत आणि मिस्टर क्लीन आहेत. ह्या दोन गोष्टी अनेकांसाठी प्रॉब्लेम बनल्या आहेत. भाजपमधील असंतुष्टांची मोट बांधण्याची त्यांची धडपड आहे. पण फार कुणी त्यांच्यामागे जाणार नाही. ओबीसी कार्ड चालण्याचे दिवस केव्हाच संपले. मराठे राष्ट्रवादीत एकजूट झाल्याने ओबीसी स्वतःहून फुटणार नाहीत. तुम्ही पहा. हे दोघे सोडले तर गडावर तिसरा कुणीही मोठा बंडखोर नव्हता. विनोद तावडे हेही अतिशय सावध खेळत आहेत.

बंड फसले तर पंकजा यांना शिवसेनेत जावे लागेल. देशाला संबोधावे त्या आवेशात पंकजा बोलल्या. पण बीड सोडला तर त्यांची शक्ती आहे कुठे? खडसे जळगाव सोडले तर कुठे दिसतात? राष्ट्रवादीत त्यांचा भाऊ धनंजय मुंडे मजबुतीने आहे. तो बहिणीला घुसू देणार नाही. उद्धव यांच्याशी पंकजा यांचे जमते. पण मग खडसेंचे काय? खडसे म्हणा किंवा पंकजा म्हणा, दोघेही असंतुष्ट आत्मे आहेत. आपण काही स्पेशल आहेत अशा थाटात वागण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. तिथेच घाव पडल्याने ते अस्वस्थ आहेत. स्वतःलाच संपायला निघालेल्या ह्या नेत्यांच्ये काय करायचे? असा प्रश्न आज भाजपला पडला असणार.

Moreshwar Badge :- Editor-in-chief of Hi Maharashtra
(Journalist by profession, senior political analyst and critique, served as a resident editor Lokmat.)

0 Comments

No Comment.