तीन आठवड्याचा कडक लॉकडाउन लावण्याचा महाराष्ट्र सरकार विचार करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधात विचार करण्यासाठी उद्या एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनाही बैठकीला बोलावले आहे. आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही कडक लॉकडाउनचे संकेत दिले.
सध्या कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार विकेंड लॉकडाउन असतानाही करोनाचे पेशंट वाढत आहेत. दिवसाला ५० हजार पेशंटची भर पडत आहे. मृत्यूदर वाढला आहे. ह्या लॉकडाउनचा फायदा झालेला दिसत नाही. लोकही गर्दी कमी करायला तयार नाहीत. ह्या महिनाअखेर १० लाख पेशंट होतील असा इशारा तज्ञांनी मागेच दिला आहे. त्यामुळे सरकार वेगळा विचार करू लागले आहे. येत्या ११ तारखेला होणारी एमपीएससीची परीक्षाही पुढे ढकलली आहे.
पण भाजप ह्या लॉकडाउनला तयार होईल का? हा खरा प्रश्न आहे. सध्या चालू लॉकडाउनलाच भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे अशातला भाग नाही. व्यापारी तर आक्रमक आहेत. येत्या १३ एप्रिलला गुढीपाडवा आहे. १४ ला आंबेडकर जयंती आहे. सणांच्या दिवशी कडक बंद ठेवायला भाजप तयार होण्याची शक्यता कमी वाटते. महाआघाडीमध्येही या बाबतीत एकवाक्यता नाही. काही मंत्री लावा म्हणतात तर कॉन्ग्रेसचे काही नेते गरिबांना रोजगाराचे पैसे द्या म्हणतात. ह्या गोंधळात परप्रांतीय मजुरांचे लोंढे गावी जायला सुरुवात झाली आहे. सरकारचे धोरण स्पष्ट नाही, घेतलेले निर्णय अंमलात आणायला यंत्रणा नाही. काय होणार आहे पुढे? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा म्हणण्याची वेळ येत आहे का?