तब्येतीच्या कारणामुळे म्हणा किंवा जबाबदारी वाढली म्हणून म्हणा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आजकाल मवाळ झाले अशी त्यांच्या मित्रांची तक्रार असते. पण भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात झालेल्या कार्यक्रमात त्यांना ऐकले. आणि जुने गडकरी परत येत चालले असे संकेत मिळाले.
‘जातीपातीचे, गटातटाचे राजकारण नको’ अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. संदीप जोशींची निवडणूक भाजप हरला, जिल्हा परिषद हातची गेली, आमदारकीच्या दोन जागा गेल्या. त्यामुळे गडकरींची चिंता समजू शकते. गटबाजी नको असा गडकरी म्हणाले याचा अर्थ नागपूरच्या भाजपमध्ये गटबाजी आहे. २०१४ पूर्वी भाजपमध्ये गटबाजी नव्हती. सत्तेसोबत ती आली. कोणी कितीही नाही म्हटले तरी भाजपमध्ये गट आहेत. गटात डझनभर उपगट आहेत. ‘वाडा’ होता तेव्हाही देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथ मुंडे यांच्या गटात होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा ‘मी दिल्ली सांभाळतो, तुम्ही महाराष्ट्र पहा’ असा गुप्त समझोता गडकरी आणि फडणवीस यांच्यात झाला. पण ‘घार उडते आकाशी, लक्ष तिचे पिलांपाशी’ अशी हल्ली गडकरींची अवस्था आहे. नरेंद्र मोदींच्या तालमीत फडणवीस आता ‘लंबी रेस का घोडा’ बनले आहेत. दोघेही महत्वाकांक्षी. पुढच्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे गडकरींना हे कीर्तन करावे लागले असावे. देवेंद्र यांनी ते ऐकले असेलच. गडकरींचे हे लसीकरण कितपत प्रभावी ठरते याची शंका घ्यायला जागा आहे. कारण भाजप आज २०१४ चा भाजप राहिलेला नाही. गटबाजीने खालपासून वरपर्यंत पोखरला गेला आहे.